मालमत्तेचे मोठे नुकसान, पंधरा बंबांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न, साहित्य पूर्णपणे जळून खाक, आगीचे कारण अद्याप स्पष्ट नाही
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I आज सकाळी जळगाव येथील एमआयडीसी परिसरातील मानराज मोटर्स शोरूमला भीषण आग लागली. सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास शोरूममधील दुसऱ्या माळ्यावर असलेल्या साहित्याच्या गोदामाला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच शोरूममध्ये एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण परिसर धुराने भरून गेला.
आग इतकी प्रचंड होती की, अग्निशमन दलाच्या पंधरा बंबांची मदत घेऊनही आग नियंत्रणात येत नाही. आगीचे लोळ खिडकीतून बाहेर येत होते, आणि दूरवरून धूर दिसत होता. आग पसरलेली असल्याने शोरूममध्ये ठेवलेले साहित्य पूर्णतः जळून खाक झाले आहे. आग लागलेली जागा बंदिस्त असल्याने तिचे वाढणे झपाट्याने झाले.
अग्निशमन दलाचे जवान आग आटोक्यात आणण्यासाठी अविरत प्रयत्न करत आहेत. तथापि, अद्याप आग पूर्णपणे नियंत्रणात आलेली नाही. घटनास्थळी एमआयडीसी पोलिसांनी धाव घेतली असून, परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांकडून अधिक तपास सुरू असून, आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.
या आगीमुळे शोरूममधील मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. परिसरातील नागरिकांची हालचालही वाढली असून, अनेक लोक घटनास्थळी जमले आहेत. आगीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून, या घटनेचे सखोल तपास सुरू आहेत.
आगीचा अधिक तपास करण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा पथक घटनास्थळी तैनात आहे.
टिप्पणी पोस्ट करा