Top News

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा मोठा निर्णय – राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य

इंग्रजी माध्यमाच्या शाळांसाठी देखील मराठी शिकवणे बंधनकारक; शालेय शिक्षण विभागाचे कठोर उपाययोजनांचे संकेत

जळगाव अपडेट न्यूज, मुंबई, वृत्तसंस्था I गेल्या काही वर्षांपासून इंग्रजी माध्यमाच्या तसेच विविध बोर्डांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ केली जात होती. यावर शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी कडक भूमिका घेतली असून, राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य असल्याची घोषणा केली आहे.  

शालेय शिक्षण विभागाच्या धोरणावर महत्त्वपूर्ण सूचना देत दादा भुसे यांनी सांगितले की, "शालेय शिक्षण विभागाच्या आगामी धोरणांची रूपरेषा लवकरच तयार केली जाईल. यामध्ये मराठी भाषा शिकवण्याबाबत कठोर पावले उचलली जातील." दादा भुसे यांच्या या घोषणेमुळे राज्यभरातील शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन बंधनकारक होणार आहे.  

केंद्रीय मंडळाच्या शाळांमध्ये देखील मराठी भाषा शिकवणे अनिवार्य होईल, आणि याबाबत कोणताही अपवाद असणार नाही, अशी ठाम भूमिका दादा भुसे यांनी घेतली आहे. "ज्या शाळांमध्ये मराठी शिकवली जात नाही, त्या शाळांवर शालेय शिक्षण विभाग कडक कारवाई करेल," असे ते म्हणाले.  

दादा भुसे यांनी मराठी भाषा शिकवणाऱ्या शिक्षकांना आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाबाबतही विचार मांडला आहे. शाळांमधील शिक्षकांना मराठी भाषेचे योग्य ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी विशेष मार्गदर्शन आणि उपाययोजना राबवण्यात येणार आहेत.  

तसेच, दादा भुसे यांनी राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आणि शाळा संस्थाचालक संघटनांसोबत विविध चर्चासत्रे आयोजित केली आहेत. यामध्ये शालेय शिक्षणाच्या सर्वांगीण विकासासाठी एक समग्र धोरण तयार करण्याची योजना आहे. लवकरच शालेय शिक्षण विभागाचा रोडमॅप जाहीर केला जाईल, तसेच शालेय शिक्षणाच्या विकासासाठी एक दशसूत्री कार्यक्रम सादर केला जाईल.  

इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठी शिकवले जात नाही, अशी अनेक तक्रारी नोंदवली जात असतानाही, दादा भुसे यांनी स्पष्ट केले की, इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्येही मराठी शिकवणे अनिवार्य आहे. "राज्यातील मराठी भाषेचे स्थान अद्वितीय आहे. केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. त्यामुळे इंग्रजी शाळांमध्येही मराठी शिकवणे बंधनकारक आहे," असे ते म्हणाले. या निर्णयामुळे राज्यभरात शालेय शिक्षणात सुधारणा होईल आणि मराठी भाषेचे स्थान अधिक दृढ होईल, अशी अपेक्षा आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने