Top News

आमदारांच्या तक्रारीनंतर कॅफेंची तपासणी : अश्लील चाळे करणार्‍या २२ तरुण-तरुणींना अटक

२२ तरुण-तरुणींना ताब्यात, यामध्ये विविध कॅफे व लॉजचा समावेश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I धुळे शहरातील काही कॅफेमध्ये तरुण-तरुणींनी अश्लील चाळे केल्याच्या तक्रारी आमदार अनुप अग्रवाल यांच्याकडे दाखल झाल्या. त्यांच्या सूचनेनुसार, पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तपास सुरू केला आणि गुरुवार, ३० जानेवारी रोजी शहरातील १० कॅफे तपासले. या तपासणीमध्ये पाच कॅफे व्यवसायिकांच्या प्रतिष्ठानांमध्ये अश्लील चाळे करणारे २२ तरुण-तरुणी आढळले. त्यांना ताब्यात घेण्यात आले.

कॅफे ज्या ठिकाणी तपासले गेले, त्यामध्ये 'डी.लाईट कॅफे', 'शाईनिंग कॅफे', 'रॉयल लॉज', 'विथ यु कॅफे' आणि 'शुगर कॅफे' यांचा समावेश होता. या कॅफेतील विद्यार्थी आणि अन्य व्यक्ती अश्लील चाळे करत असताना पोलिसांच्या पथकाला आढळले. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या पालकांना बोलावून त्यांना या प्रकाराची माहिती देण्यात आली.

कारवाईत सहभागी अधिकारी आणि पथक: धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, देवपूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरिष्ठ निरीक्षक श्रीराम पवार आणि जिविशा शाखेच्या निकीता महाले यांच्यासह महापालिकेच्या आयुक्त अनिता दगडे पाटील तसेच आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह पोलीस पथकाने या कारवाईत भाग घेतला.

पोलिसांनी या प्रकरणात विद्यार्थ्यांसह कॅफे चालक आणि मालकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. अशा प्रकारच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस प्रशासनाने दिले आहे.

ही कारवाई धुळ्याच्या कॅफे संस्कृतीत मोठी गडबड निर्माण करणारी ठरली आहे, आणि यामुळे इतर कॅफे आणि मनोरंजनाच्या ठिकाणी अशा प्रकारच्या अनावश्यक वर्तनावर लक्ष ठेवले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने