समाजातील १५०० बंधू भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद, विविध सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रमांनी गाजवले वातावरण
जळगाव अपडेट न्यूज, कल्याण I येथील शारदा विद्या मंदिर, लालचौकी मध्ये नुकतेच लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याणच्या वार्षिक स्नेहसंमेलन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास समाजातील सुमारे १५०० बंधू भगिनी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आरंभापासूनच समाजातील सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी विविध सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले, ज्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने केली गेली. त्यानंतर विदयेशिवायचे पूजन, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर प्रमुख पाहुणे डॉ.प्रा. शिरीष भागवत पाटील, डॉ. जयंत रमेश चौधरी, मुंबईतील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक रत्नाकर चौधरी यांचा व्यासपीठावर सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक राजेश भंगाळे यांनी केले.
समाज मंडळाचे अध्यक्ष हेमंत अशोक चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना, कल्याणमधील अधिकाधिक समाजबांधवांनी या स्नेहसंमेलनात सहभागी होऊन आपापल्या विचारांची देवाण-घेवाण करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, समाजातील एकतेसाठी अधिक कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
विशेषत: बालगोपाळांचे सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध स्पर्धांनी स्नेहसंमेलनाला एक वेगळाच रंग दिला. समाजातील जेष्ठ नागरिकांसाठी नेत्र तपासणी व दंत चिकित्सा शिबिराचे आयोजन रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, कल्याण आणि इंदाला शैक्षणिक समूह यांच्या सहयोगाने करण्यात आले. या शिबिरात समाजातील जेष्ठ नागरिकांना मोफत चष्मे वितरित करण्यात आले.
महिलांसाठी आयोजित लकी ड्रॉच्या माध्यमातून पैठणी साड्यांचे व तसंच गुणगौरव व विशेष प्रविण्य मिळवलेल्या मुलांचे व्यासपीठावर बक्षिस व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंडळाचे सहसचिव दीपक नेमाडे व प्रतिभा भारंबे यांनी अतिशय उत्तम आणि आकर्षक पद्धतीने केले. या कार्यक्रमासाठी समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली, तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिसरातील दानशूर सदस्यांनी सहाय्य केले.
स्नेहसंमेलनात सामूहिक स्पर्धा, अस्सल लेवा पाटील पद्धतीचे वरण-बट्टी वांग्याची भाजी तसेच पारंपरिक भोजनामुळे उपस्थितांमध्ये आनंद आणि उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाला यश मिळाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी आपल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचे संकेत दिले.
डॉ. जयंत रमेश चौधरी यांनी आपल्या भाषणात, "एकदा येऊन तर बघा" अशी टॅगलाईन सांगितली, जी आगामी कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविण्याचे आवाहन करणारी ठरली.
या स्नेहसंमेलनाद्वारे लेवा पाटीदार समाज मंडळ कल्याणने समाजाच्या एकतेला नव्या पिढीसोबत आणण्यासाठी मोठा प्रयत्न केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा