रांजणगाव फाट्यावर क्रूझर व दुचाकीची समोरासमोर धडक; दुचाकीवरील महिला जागीच ठार, जखमींवर उपचार सुरू
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव रविवारी रोजी दुपारी १.३० ते २ वाजेच्या सुमारास चाळीसगाव ते छत्रपती संभाजीनगर रस्त्यावरील रांजणगाव फाट्यावर क्रूझर चारचाकी व दुचाकीच्या झालेल्या भयंकर अपघातात दुचाकीवरील महिला जागीच ठार झाली, तर अन्य ६ जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील खेर्डे तांडा येथील १९ वर्षीय कृष्णा संजय जाधव आपल्या आजी चंदाबाई मलखान पवार (वय ६५, रा. कोंगानगर, ता. चाळीसगाव) यांना दुचाकीवरून चाळीसगावकडे घेऊन जात होते. या दरम्यान रांजणगाव फाट्यावर चाळीसगावकडून संभाजीनगर कडे भरधाव वेगाने येणाऱ्या क्रूझर (MH 20 CH 6522) या चारचाकी वाहनाशी दुचाकीची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.
या अपघातात दुचाकीवरील चंदाबाई मलखान पवार यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच, दुचाकी चालक कृष्णा संजय जाधव यासह क्रूझरमधील चालक व प्रवासी असे ५ जण जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, आणि उपचार सुरु आहेत.
घटनास्थळी चारचाकी वाहन उलटले असून, या अपघातामुळे रांजणगाव फाट्यावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळित झाली. दरम्यान, चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, अपघाताच्या कारणाची तपासणी सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात या अपघाताच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.पोलीस प्रशासनाने अपघाताच्या बाबतीत अधिक तपास सुरू ठेवला असून, वाहतूक सुरळीत करण्यासाठी कार्यवाही केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा