पु.ना. गाडगीळ अँड सन्स, रिंग रोड येथील आर्ट गॅलरीत आ. राजूमामा भोळेंच्या हस्ते उदघाटन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I इयत्ता ७ वीतील विद्यार्थिनी कु. सुरभी राजेश नारखेडे हिने आपल्या काढलेल्या विविध चित्रांचे प्रदर्शन पु.ना. गाडगीळ अँड सन्स, रिंग रोड येथील आर्ट गॅलरीत भरवले आहे. १५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता या प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार सुरेश (राजुमामा) भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष व माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, त्यांचे चिरंजीव डॉ. अनिकेत पाटील, पु.ना. गाडगीळचे व्यवस्थापक संदिप पोतदार, चित्रकला शिक्षक तरुण भाटे व प्रदीप (बंडू) भोळे होते.
आ. राजूमामा भोळे व डॉ. उल्हास पाटील यांनी सुरभीच्या सर्व चित्रांचे कौतुक केले. त्यात असलेल्या जीवनतत्त्वाची प्रशंसा केली. त्यांचा असा विश्वास आहे की सुरभीच्या चित्रांच्या माध्यमातून तिच्या कलेतला आत्मा व व्यक्तिमत्त्व दिसून येतो. तसेच, प्रदर्शनाच्या नावाप्रमाणेच या चित्रांमध्ये जिवंतपणा उतरविण्यात आलेला आहे, असे त्यांनी सांगितले. प्रदर्शनातील सर्व स्टील-लाईफ पेंटिंग्ज हे डॉ. उल्हास पाटिल यांनी, तसेच काही मंदिरांची चित्रे राजूमामा भोळे यांनी विकत घेऊन सुरभीला प्रोत्साहन दिले. सुरभी ही उद्योजक राजेश नारखेडे व डॉ. स्वाती राजेश नारखेडे यांची मुलगी असून तिच्या चित्रकलेला मार्गदर्शन करणारे प्रतिष्ठित चित्रकला शिक्षक तरुण भाटे सर आहेत. कार्यक्रमात प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. महिलांनी, विद्यार्थ्यांनी आणि इतर लोकांनी उत्स्फूर्तपणे या प्रदर्शनाला भेट दिली. या प्रदर्शनाची वेळ सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत असून ते १६ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२४ पर्यंत सर्वांसाठी खुले आहे. सूत्रसंचालन शुभदा नेवे यांनी केले, तर आभार प्रदीप भोळे यांनी मानले.
टिप्पणी पोस्ट करा