जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी प्रकरण
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या नूतन मराठा महाविद्यालयात संस्थेच्या कार्यालयातून कागदपत्रांची चोरी, मारहाण करणे, आणि जिवेठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विजय भास्कर पाटील यांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारी जळगाव न्यायालयात हजर करण्यात आले असता, सरकारपक्षाने युक्तीवाद करत, संशयित आरोपीकडून कागदपत्रांचा वापर कुठे व कोणत्या कामासाठी केला याची माहिती घेण्यासाठी ७ दिवसाची पोलीस कोठडी मागितली. न्यायालयाने विजय पाटील यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेचे मानद सचिव निलेश रणजीत भोईटे यांच्या तक्रारीनुसार, १९ जून २०२१ रोजी तत्कालीन विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. प्रवीण चव्हाण, विजय भास्कर पाटील, संजय भास्कर पाटील, विनोद प्रभाकर पाटील आणि अज्ञात व्यक्तींनी नूतन मराठा महाविद्यालयाच्या कार्यालयात प्रवेश केला. यावेळी शिक्षकांचे हजेरी पुस्तक, आवक-जावक रजिस्टर, संस्थेचे लेटर हेड बुक, ऑडीट संबंधित कागदपत्रे, आणि इतर महत्वाची कागदपत्रे चोरी केली गेली. यासोबतच प्राचार्य व इतर काही कर्मचाऱ्यांना मारहाण केली आणि धमक्या दिल्या.
गेल्या साडेतीन वर्षांपासून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. अर्ज व तक्रारींसाठी विजय भास्कर पाटील यांना जिल्हापेठ पोलिसांनी बोलावले होते. त्यांनी नोटीस घेण्यास नकार दिला, म्हणून त्यांना ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला. सरकारपक्षाने न्यायालयात सांगितले की, हा गुन्हा तत्कालीन विशेष सरकारी अभियोक्ता ॲड. प्रवीण चव्हाण यांच्या सांगण्यावरून झाला आहे. विजय भास्कर पाटील यांच्यापासून कागदपत्रांचा गैरवापर कसा व कुठे केला याची माहिती घेणे आवश्यक आहे. तसेच, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात सादर करण्यात आलेले कागदपत्रे कोणत्या व्यक्तीने सादर केली, याचा शोध घ्यावा लागणार आहे.
अटक केलेल्या संशयिताच्या मोबाईल, लॅपटॉप अशा साहित्याची तपासणी करणे आवश्यक असल्याने सरकारपक्षातर्फे अॅड. अविनाश पाटील यांनी पोलीस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने विजय पाटील यांना १८ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
टिप्पणी पोस्ट करा