प्रवाशांच्या तक्रारीनंतर विभाग नियंत्रकांनी तातडीने चालकावर निलंबनाची कारवाई, "प्रवाशांच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टाळली"
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव एसटी डेपोमधून बाभूळगाव मुक्कामाला जाणारी बस चालक आनंद माळी याने मद्यधुंद अवस्थेत चालवली असल्याची माहिती प्रवाशांनी दिली. ही घटना सोमवारी, १६ डिसेंबर रोजी रात्री घडली, जेव्हा बसने पाळधी गावाजवळील पुलाजवळ प्रवास सुरू केला होता. बसमधील ५० हून अधिक प्रवाशांच्या लक्षात आले की, चालक आनंद माळी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत आहे. प्रवाशांनी तत्काळ बस थांबवून वाहकाला याबाबत सूचित केले.
प्रवाशांच्या तक्रारीनुसार विभाग नियंत्रक भगवान जगनोर घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दुसऱ्या चालकाची तातडीने व्यवस्था केली आणि गाडी मार्गस्थ केली. आनंद माळीच्या वैद्यकीय तपासणीत मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी आनंद माळीवर निलंबनाची कारवाई केली.
घटनेनंतर विभाग नियंत्रकांनी जळगाव आगाराच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत, हिवाळ्यात लवकर अंधार पडत असल्यामुळे मुक्कामी गाड्यांना लवकर मार्गावर सोडण्याच्या सूचना दिल्या. तसेच, एसटीच्या चालकांना प्रवाशांच्या सुरक्षा बाबत कडक सूचना देण्यात आल्या.
ही घटना जळगाव एसटी विभागासाठी चिंता का कारण ठरली आहे, कारण काही दिवसांपासून अपघातांची शृंखला सुरू आहे. एसटी प्रशासनाने यावर तत्काळ कारवाई केली असून, प्रवाशांच्या सुरक्षा आणि मार्ग सुरक्षेची जबाबदारी घेतली आहे.
टिप्पणी पोस्ट करा