संतोष पवार व राजेश जाधव यांच्याविरुद्ध फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील एका संस्था चालकांची तब्बल १ लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली. याप्रकरणी दोन जणांविरुद्ध जळगाव येथील रामानंद नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीवरून धनश्रीनगर येथील युवराज प्रकाश बारी (३५) यांची शैक्षणिक संस्था आहे. त्यांना प्ले ग्रुप व नर्सरीचे वर्ग सुरू करण्यासाठी जागेची आवश्यकता होती. यासाठी त्यांनी संतोष पदमसिंग पवार (६५, रा. मुंबई) आणि राजेश भरत जाधव (रा. ओमशांती नगर, पिंप्राळा) यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना इमारतीची भाडेतत्त्वावर जागा देण्यास मान्यता दिली. युवराज बारी यांनी संबंधित इमारतीसाठी काही रक्कम डिपॉझिट म्हणून दिली. तसेच, इमारतीची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्याचा खर्चही करण्याचे ठरविले. त्यानुसार बारी यांनी इमारतीचे काम सुरू केले व तेथे साहित्याची खरेदी केली. यावरून किमान खर्च नंतर वजा केला जाईल असे ठरले. परंतु, पवार आणि जाधव यांनी अचानक इमारतीची विक्री जाहीर केली आणि बारी यांनी तयार केलेल्या साहित्याची तोडफोड केली. यामुळे बारी यांनी दोघांशी संपर्क साधून जागेच्या बाबतीत चर्चा केली, परंतु कोणताही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. यानंतर, २४ जून २०२२ ते १ सप्टेंबर २०२२ दरम्यान झालेल्या या फसवणुकीच्या घटनेबाबत बारी यांनी १६ डिसेंबर २०२४ रोजी रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यावरून संतोष पवार आणि राजेश जाधव यांच्याविरुद्ध एक लाख ७१ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शरद वंजारी तपास करीत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा