Top News

सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर भीषण अपघात: तीन मित्रांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

भुसावळ येथून हळदीच्या कार्यक्रमावरून परतत असताना कार झाडावर आदळून ५ मित्रांपैकी ३ ठार, जखमींवर उपचार सुरू

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I तालुक्यातील सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर भुसावळ येथून मित्राच्या बहिणीच्या हळदीच्या कार्यक्रमावरून परतत असताना, ५ मित्रांची भरधाव कार झाडावर आदळली. या अपघातात तीन मित्रांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.

हे अपघात शुक्रवारी, २० डिसेंबर रोजी पहाटे ३ वाजता घडला. मृतकांमध्ये शुभम दशरथ सोनार (वय २५, रा. नाला परिसर, रावेर), मुकेश किशोर रायपुरकर (वय २३, रा. गांधी चौक, रावेर) आणि जयेश केशव भोई (वय २२, रा. भोईवाडा, रावेर) यांचा समावेश आहे.

पाच मित्र भुसावळ येथून हळदीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन परतत होते. तेव्हा त्यांच्या कारने सावदा ते पिंपरुळ रस्त्यावर झाडाला जोरदार धडक दिली, ज्यामुळे कारचा पूर्ण चक्काचूर झाला. या अपघातात शुभम सोनार, जयेश भोई आणि मुकेश रायपुरकर हे जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी गणेश भोई (वय २७, रा. भोईवाडा) आणि विकी उदय जाधव (वय २५, रा. स्टेशन रोड, रावेर) यांना जळगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

गणेश भोई फोटोग्राफीचे काम करतो, तर विकी जाधव एक विद्यार्थी आहे. या घटनेमुळे रावेर तालुक्यात शोककळा पसरली असून, सावदा पोलीस स्टेशनला घटनेची नोंद घेण्याचे काम सुरू आहे.

मृतक शुभम सोनार याला आई-वडील आणि तीन बहिणींचा, जयेश भोई याला आई-वडील, मोठा भाऊ आणि बहीण, तर मुकेश रायपुरकर याला आई आणि बहीण असा परिवार आहे.

घटनेबाबत सावदा पोलिस स्टेशनला नोंद करण्याचे काम सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने