भुसावळ येथील शस्त्र चोरी प्रकरणातील आरोपीला अटक; ए.के.४७ व गलील ५.५६ रायफल हस्तगत, राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा गुन्हा उघडकीस
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुक्यातील वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतून चोरी गेलेल्या ए.के.४७ रायफल व गलील ५.५६ रायफल, या शस्त्रास्त्रांची चोरी उघडकीस आणण्यात महाराष्ट्र एटीएस पथकाला यश आले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरलेल्या या घटनेत एकाला अटक करण्यात आली असून उर्वरित दोन रायफल्स जप्त करण्यात आल्या आहेत.
चोरीची घटना
१९ ते २१ ऑक्टोबर दरम्यान, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीतील शस्त्रागारातून ए.के.४७ रायफल्स ३ आणि गलील ५.५६ रायफल्स २ अशा पाच शस्त्रांची चोरी झाली होती. अज्ञात आरोपींनी शस्त्रागाराचे कुलूप तोडून बंदुका पळवल्या होत्या. यावर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
एटीएसच्या पथकाचे तपासकार्यात यश
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य एटीएसचे प्रमुख व जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या निर्देशानुसार, नाशिक युनिटच्या एटीएस पथकाने तपास सुरू केला. रेल्वे रुळावर सापडलेल्या तीन रायफल्सनंतर उर्वरित दोन रायफल्सचा शोध घेण्यासाठी एटीएसने शिताफीने तपास केला. आरोपी लिलाधर उर्फ निलेश बळीराम थाटे (वय ४३, राहणार तळवेल, तालुका भुसावळ) याला अटक करण्यात आली आहे. चौकशी दरम्यान त्याने चोरी कबूल केली असून, उर्वरित शस्त्रेही पोलिसांकडे जमा केली आहेत.
आरोपीची कबुली
तपासादरम्यान, आरोपीने चोरी गेलेल्या रायफल्स रेल्वे रुळावर टाकल्याचे कबूल केले. सदर गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल व मोबाईल देखील पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास जळगाव जिल्हा पोलीस करत आहेत.
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा
राष्ट्रीय सुरक्षेसाठी संवेदनशील मानल्या जाणाऱ्या या गुन्ह्याचे उलगडा करण्यास एटीएस पथकाला यश आल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा