Top News

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घरफोडीच्या गुण्यातील आरोपीला केले जेरबंद

 
पवन नगर, धुळे येथील रेकॉर्ड वरील गुन्हेगार साहिल शेखने जळगाव शहरातील जेष्ठ नागरिकांचे घर फोडले; अटक करून न्यायालयासमोर हजर

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I ज्येष्ठ नागरिकाच्या घरात घुसून घरफोडी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस स्थानकात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी आहे की, दि. ६ रोजी जळगाव शहरातील रामानंद नगर येथील जेष्ठ नागरिक वनिता जगन्नाथ चौधरी यांचे घरात घरफोडी केली. त्या दिवशी, महिला प्रवचनास गेलेल्या असताना, दुपारी २:०० वाजता अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि २३७ ग्रॅम सोने, ४०० ग्रॅम चांदी, तसेच १६,५०० रुपये रोख चोरी करून नेले. या घटनेची माहिती रामानंद नगर पोलीस स्टेशनला मिळाल्यानंतर अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घरफोडी दिवसा झाल्याने जेष्ठ नागरिक महिलांचे घर असल्यामुळे वरिष्ठांकडून ही घटना लवकर उघडकीस आणण्याचे निर्देश दिले गेले होते. त्यानुसार, रामानंद नगर पोलीस स्टेशनने तपास सुरु केला. तपासाच्या दरम्यान, पवन नगर, धुळे येथील गुन्हेगार साहिल प्रविण झाल्टे उर्फ साहिल शेख याच्यावर संशय व्यक्त केला गेला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला त्याच्याबद्दल माहिती मिळाली होती की तो धुळे शहरात आलेला आहे. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दोन दिवसांपर्यंत धुळे शहरात थांबून आरोपीचा शोध घेत होता. अखेर, दि. २८/११/२०२४ रोजी आरोपीला पवन नगर, धुळे येथून अटक करण्यात आली.

चौकशीदरम्यान आरोपीने घरफोडीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याला पुढील तपासासाठी रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक श्री. अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात केली गेली. तपास पथकामध्ये पो.उप.निरी. दत्तात्रय पोटे, सह.फौ. रवी नरवाडे, विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, अतुल वंजारी, पो.हे.कॉ. विजय पाटील, हरीलाल पाटील, राजेंद्र मेढे, पोकॉ. प्रदिप चवरे, अक्रम शेख, आणि ईश्वर पाटील यांचा समावेश आहे.

आरोपी साहिल झाल्टेवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न, घरफोडी तसेच इतर गंभीर गुन्ह्यांचे नोंद असलेले आहेत. त्याला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पो.उप.निरी. प्रदिप बोरुडे, रामानंद नगर पोलीस स्टेशन करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने