लाच घेतल्याच्या प्रकरणात फरार असलेल्या राजकिरण सोनवणे यांच्या घरावर छापेमारी, मोठ्या प्रमाणात मुद्देमाल सापडला
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्य उत्पादन शुल्क भुसावळ विभागाचे उपनिरीक्षक राजकिरण सोनवणे यांच्यावर लाच घेतल्याप्रकरणी गंभीर आरोप करण्यात आले होते. २३ नोव्हेंबर रोजी भुसावळ येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाईत दारूच्या बाटल्या पकडल्या होत्या, कारवाई न करण्याच्या मोबदल्यात राजकिरण सोनवणे यांनी ३० हजार रुपयांची लाच मागितली होती. या प्रकरणी सोनवणे व एक खासगी व्यक्ती किरण माधव सूर्यवंशी यांच्यावर फैजपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर सोनवणे फरार झाले होते. त्यानंतर लाचलुचपत विभागाने विशेष न्यायालयाच्या परवानगीने २९ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० वाजता सोनवणे यांच्या घरावर छापेमारी केली. या छापेमारीत ४० लाख ९८ हजार ४४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. घरातून १ लाख ४९ हजार २९० रुपयांच्या दारूच्या बाटल्या, २५ लिटर गावठी हातभट्टी दारू, बुलेट मोटरसायकल, कारचे कागदपत्र, सोनं-चांदीचे दागिने, पिस्तूलाच्या रिकाम्या पुंगळ्या, तसेच १ लाख ९१ हजार रुपयांची रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
या कारवाईमध्ये नाशिक लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक शर्मिला घागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने भाग घेतला. जळगाव लाचलुचपत विभागाचे पोलीस उपअधिक्षक योगेश ठाकूर यांनी याबाबत अधिक माहिती दिली. याप्रकरणामुळे भुसावळ विभागात मोठी खळबळ उडाली आहे.
टिप्पणी पोस्ट करा