एमपीडीए कायद्यानुसार जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने स्थानबद्धतेची कारवाई; जळगाव आणि चाळीसगाव येथील गुन्हेगारांची रवानगी
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I जळगाव आणि चाळीसगाव येथील दोन रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानुसार एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. या गुन्हेगारांची कोल्हापूर आणि नागपूर कारागृहात रवानगी केली गेली आहे.
एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुरुजीत सिंग सुजान सिंग बावरी (वय २४) याच्यावर ११ गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी बावरीच्या विरुद्ध प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्यानुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी बावरीला कोल्हापूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोलीस उपनिरीक्षक शरद बागल, अशोक, योगेश बारी, किशोर पाटील, छगन तायडे आणि किरण पाटील यांनी त्याला ताब्यात घेऊन नागपूर कारागृहात रवानगी केली.
तसेच, चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यातील निखिल उर्फ भोला सुनील अजबे (वय २३) याच्यावर ९ गुन्हे दाखल आहेत. अजबेच्या विरुद्ध स्थानबद्धतेचा प्रस्ताव चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कवाडी यांनी तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी अजबेची रवानगी नागपूर कारागृहात करण्याचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक कवाडी आणि त्यांच्या टीमने अजबेला ताब्यात घेऊन कारागृहात रवानगी केली.
यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावांमध्ये पोलिस अधीक्षक महेश वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी संदीप गावित, राजेश सिंह चंदेल यांचे मार्गदर्शन होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकांनी या कार्यवाहीत महत्त्वाची भूमिका बजावली.
टिप्पणी पोस्ट करा