जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I विधानसभा निवडणुकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी विविध पातळ्यांवर कडक कारवाई केली. इतर राज्यांमधून किंवा जिल्ह्यांमधून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची तपासणी केली आणि विशेषतः सहा आंतरराज्य आणि नऊ आंतरजिल्हा नाक्यांवर पोलिसांनी बारीक नजर ठेऊन मोठ्या प्रमाणावर जप्ती केली. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तसेच, निवडणूक प्रक्रियेस सुरळीत ठेवण्यासाठी स्थानिक पोलिस बंदोबस्तासह सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि होमगार्ड यांचे सहकार्य घेतले गेले. यामुळे निवडणुकीसाठी असलेल्या ११ मतदारसंघांतील ३,६१७ मतदान केंद्रांवर शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. पोलिसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईमुळे गुन्हेगारांवर ठाम वचक ठेवला गेला आणि निवडणुकीत कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटनांना वाव दिला गेला नाही.
तडीपार होणे म्हणजे काय?
एखादा गुन्हेगार वारंवार गुन्हे करतो, आणि त्याची वर्तणूक सुधारत नाही, अशा स्थितीत त्यावर तडीपारीची कारवाई केली जाते. यासाठी संबंधित गुन्ह्यांच्या आधारे प्रांताधिकारींकडे तडीपारीचा प्रस्ताव पाठवला जातो, ज्यावर मंजुरी मिळाल्यानंतर त्याला जिल्ह्याबाहेर पाठवले जाते. निवडणुकीसाठी यापूर्वीच कडक सुरक्षा व्यवस्था आणि नियोजन पोलिसांनी केले होते, ज्यामुळे या काळात निवडणुकीशी संबंधित कोणतेही गंभीर गुन्हे घडले नाहीत.
टिप्पणी पोस्ट करा