Top News

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून रेल्वे कर्मचाऱ्याची ८.१२ लाखांची फसवणूक

व्हॉट्सअॅप व टेलिग्रामद्वारे संपर्क साधून तीन अनोळखी व्यक्तींनी सुरुवातीला नफ्याचे आमिष दाखवले; नंतर मोठ्या रकमेची फसवणूक करत जळगाव सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव, अपडेट न्यूज, निखिल वाणी I शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल आठ लाख १२ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. ही फसवणूक ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान घडली असून, जळगाव सायबर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अनोळखी तीन व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भुसावळ तालुक्यातील रहिवासी आणि सध्या मुंबईतील रेल्वेच्या मेकॅनिकल विभागात कार्यरत असलेले संबंधित कर्मचारी, सुटीवर गावी आले होते. त्यावेळी व्हॉट्सअॅपवरून तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि एक लिंक पाठवून त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये अॅड केले. त्यानंतर या व्यक्तींनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे आमिष दाखवले.

सुरुवातीला रेल्वे कर्मचाऱ्याने दोन वेळा प्रत्येकी १०,५०० रुपये आणि नंतर २०,५०० रुपये असे छोटे गुंतवणुकीचे व्यवहार केले. त्यावर प्रत्येकी चार हजार रुपये नफा मिळाल्याने त्यांचा विश्वास बसला. मात्र, यानंतर मोठी रक्कम गुंतविल्यानंतर त्यांची तब्बल आठ लाख १२ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली.

सध्या पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, नागरिकांनी अशा प्रकारच्या ऑनलाइन आमिषांपासून सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने