भरवस्तीत हत्या, पत्नीचा रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह, पोलिस तपास सुरू, हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट नाही
जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरात नवरात्रीच्या उत्सवात धामधूम सुरू असतानाच पंचमुखी हनुमान मंदिराच्या मागील बाजूस एका ५७ वर्षीय महिलेचा निघृण खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भरवस्तीत महिलेच्या डोक्यावर कठीण वस्तूने वार करून हत्या करण्यात आल्याचा अंदाज आहे. घटनास्थळी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तातडीने पोहोचले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील रणछोड नगर परिसरात राहणारे राजेश नवाल यांचे दाणाबाजारात धान्याचे दुकान आहे. गुरुवारी, राजेश नवाल नेहमीप्रमाणे दुकानात गेले होते. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या भावाची पत्नी सायंकाळच्या वेळी मंदिरात गेली होती, तर राजेश नवाल यांच्या पत्नी सुवर्णा नवाल (वय ५७) या घरी एकट्याच होत्या.
रात्री ९ वाजता, राजेश नवाल घरी आल्यावर त्यांना पत्नी सुवर्णा नवाल या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळल्या. त्यानंतर पोलिसांना तातडीने सूचित करण्यात आले. घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, एमआयडीसी पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम आणि पोलीस पथकाने घटनास्थळाची पाहणी केली.
सुवर्णा नवाल यांच्या पश्चात २ मुली आणि १ मुलगा असा परिवार आहे. एक मुलगी विवाहित असून मुलगा आणि दुसरी मुलगी नोकरीनिमित्त पुणे आणि मुंबई येथे असतात. या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, पोलीस तपास सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा