जागोजागी पाणी साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात: न्यु लक्ष्मी नगरात पाणीच पाणी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील वाघ नगरातील कोल्हे हिल्स परिसरातील रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने आबालवृद्धांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच सततच्या पावसाच्या पाण्याने रस्त्यावर पाणी साचून संपूर्ण परीसर चिखलमय झालेला दिसून येत असुन रस्त्याने जाणे - येणे अशक्य झाले आहे. या परीसरात सुविधा मिळत नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
स्वच्छता कर्मचारी येईनात
कोल्हे हिल्स नगरात स्वच्छता कर्मचारी जणू धुमकेतूच कधी दिसतात कधी दिसत नाही. त्यामुळे नगरातील स्वच्छता फक्त नावालाच दिसत असल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यातच या भागात स्वच्छता केली जात नसल्याने डासांचा उपद्रव होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
कोल्हे हिल्स परीसरात सावत्रपणाची वागणूक
कोल्हे हिल्स परिसरातील शेजारी असलेल्या कॉलन्यांमध्ये काही रस्ते कॉक्रिटीकरण करण्यात आले आहेत. मात्र, कोल्हे हिल्स परीसरात एकही रस्त्याचे काम न झाल्याने दुजाभाव करून सावत्रपणाची वागणूक दिली जात असल्याचे नागरिकांनी सांगितले
साथीचे आजार पसरण्याची भीती
रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर होते. परिणामी साथीचे आजार पसरण्याची भीती आहे. तरीही, आरोग्य विभागाकडून उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे.
टिप्पणी पोस्ट करा