Top News

उमाळा-गाडेगावजवळ भीषण अपघात; पिंप्राळा हुडकोतील दाम्पत्याचा मृत्यू

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव तालुक्यातील उमाळा-गाडेगाव दरम्यान भीषण अपघातात पिंप्राळा हुडको येथील दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (२५ मार्च) सायंकाळच्या सुमारास घडली.

मृतांमध्ये मुझफ्फर अली सय्यद बबन (वय ६०) आणि ताहेराबी मुजफ्फर अली (वय ५५, दोघे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव) यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फर अली हे पत्नी ताहेराबी व कुटुंबासह पिंप्राळा हुडको येथे राहत होते. ते मसाला विक्रीचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. बुधवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी ते पत्नीसमवेत दुचाकी (एमएच १९ इजे ३८९८) वरून फर्दापूर येथे गेले होते.

लग्न समारंभ आटोपून परत येत असताना उमाळा ते गाडेगाव दरम्यानच्या पुलाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले.

स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच नातेवाईक व मित्रपरिवाराने रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी अद्याप पोलिसात नोंद करण्यात आलेली नसून पुढील तपास सुरू आहे. मृत दाम्पत्याच्या पश्चात दोन मुले आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने