Top News

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे जळगावात भव्य स्वच्छता अभियान

जिल्हाभरातून २,९६२ स्वयंसेवकांचा सहभाग; १२१ टन कचरा हटवून स्वच्छतेचा आदर्श

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सामाजिक बांधिलकी जपत स्वच्छ आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश देत डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (ता. अलिबाग, जि. रायगड) यांच्या वतीने रविवारी जळगाव जिल्ह्यात भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले. जिल्ह्यातील विविध शहरांमध्ये एकाच वेळी पार पडलेल्या या उपक्रमाला स्वयंसेवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या स्वच्छता मोहिमेत जळगावसह जामनेर, धरणगाव आणि एरंडोल या चार ठिकाणी एकत्रितपणे तब्बल १२१ टन कचरा हटवण्यात यश आले. या अभियानात एकूण २,९६२ श्री सदस्यांनी प्रत्यक्ष श्रमदान करून परिसर स्वच्छ करण्यासाठी योगदान दिले. शिस्तबद्ध नियोजन, वेळेचे काटेकोर पालन आणि सामूहिक शक्तीच्या जोरावर हा उपक्रम यशस्वी ठरला.

विशेष म्हणजे, एकट्या जळगाव शहरातूनच ७७ टन कचरा गोळा करण्यात आला. शहरातील प्रमुख रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, नाले परिसर, बाजारपेठा तसेच गर्दीच्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर साफसफाई करण्यात आली. अनेक ठिकाणी साचलेला कचरा, प्लास्टिक व इतर टाकाऊ वस्तू हटवून परिसर स्वच्छ करण्यात आला. परिणामी शहरातील वातावरण अधिक स्वच्छ व प्रसन्न झाले.

या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागरूकता निर्माण झाली असून “स्वच्छता ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे,” हा संदेश अधोरेखित झाला. स्वयंसेवकांनी दाखवलेली शिस्त, एकजूट आणि सामाजिक भावना यामुळे उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

स्थानिक नागरिकांच्या मते, अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने राबविण्यात आले तर शहरातील स्वच्छतेचा दर्जा उंचावण्यास मोठी मदत होईल. सामाजिक संघटनांच्या पुढाकारातून स्वच्छ, निरोगी आणि सुंदर शहरनिर्मितीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले जात असल्याचे या अभियानातून स्पष्ट झाले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने