Top News

साई नगरच्या महिलांनी लाेकवर्गणीतून साकारले भव्य नीलकंठेश्वर महादेव मंदिर

साईभक्त महिला मंडळाचा पुढाकार; एकाच मंदिरात रामदरबार, गणपती, शिवलिंगासह ९ मूर्तींची स्थापना

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I"एकीचे बळ आणि दृढ इच्छाशक्ती असेल तर काय साध्य होऊ शकतं, याचं उत्तम उदाहरण खोटे नगरातील साई नगर परिसरात पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि बालकांसाठी हक्काचे विरंगुळ्याचे आणि भक्तीचे केंद्र असावे या ध्येयातून अडीच वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या साई भक्त महिला मंडळाच्या परिश्रमाला अखेर यश आले आहे. लोकवर्गणीतून महापालिकेच्या ५००० स्केअर फूट खुल्या भूखंडावरील ६०० स्केअर फूट जागेत लाेकवर्गणीतून ‘नीलकंठेश्वर महादेवाच्या' भव्य मंदिराची उभारणी करण्यात आली असून महाशिवरात्रीच्या सर्वार्थसिद्धी, शुक्रादित्य, श्रवण नक्षत्राच्या अत्यंत शुभ योगावर या मंदिराचा कलशारोहण सोहळा जल्लाेषात पार पडला.
साई नगरातील सुमारे १०० महिलांच्या पुढाकाराने मे २०२३ मध्ये महापालिकेच्या खुल्या भूखंडावर नीळकंठेश्वर महादेव मंदिराच्या बांधकामासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. साई भक्त महिला मंडळाची स्थापना करून महिलांनी मंदिरासाठी लोकसहभागातून निधी उपलब्ध करून तीन वर्षात येथे नीलकंठेश्वर महादेव मंदिर पूर्णत्वास आले आहे. मंदिराचा कलशाराेहण साेहळा १२ ते १६ फेब्रुवारी दरम्यान जल्लाेषात पार पडला. भाविकांना एकाच मंदिरात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान (राम दरबार), महादेवाची पिंड, नंदी, गणपती, दुर्गा माता, राधा-कृष्ण अशा एकूण ९ मूर्तींची भक्ती करता येणार आहे. आगामी काळात मंदिराच्या परिसरात गो-शाळा, ओपन जीम, नाना-नानी पार्क उभारण्यात येण्याचा मानस साई भक्त महिला मंडळाचा असल्याचे अध्यक्षा शोभाबाई चौधरी व प्रविण चाैधरी यांनी व्यक्त केला. तसेच मंदिरासाठी अण्णासाहेब पाटील यांचे विशेष योगदान लाभले आहे.

सुमारे ३१ फूट उंच आहे मंदिर
महापालिकेच्या ५००० स्केअर फूट खुल्या भूखंडापैकी ६०० स्केअर फूट जागेत मंदिर तयार झाले आहे. मंदिर जमिनीपासून सुमारे ३१ फूट उंच असून मंदिरावर ५ फुटांचा पंचधातूचा कळस आहे. मंदिरात जयपूर येथून आणलेल्या नऊ मूर्ती म्हणजे शक्ती-भक्तीचे प्रतिक आहेत. यात दास हनुमान रूपातील मूर्ती ११ इंचाची असून इतर मूर्ती ह्या २४ इंचाच्या आहेत. या मूर्ती जयपूर येथील श्रवणकुमार यांनी घडविल्या असून त्यांनी नंदुरबार येथे २१ फूट उंच रामाची मूर्ती साकारली आहे.

असे झाले पाच दिवस कार्यक्रम
मूर्ती स्थापनेनिमित्ताने १२ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता साईरातून वाजत-गाजत सुमारे ३ किमीपर्यंत कलशयात्रा काढण्यात आली. यात महिला व पुरूष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. कलशयात्रेनंतर अरणी मंत्राने हवनकुंड प्रज्वलित करून नऊ जोडप्यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर भजन संध्या असे विविध कार्यक्रम झाले. तीन दिवस पूजाविधी झाल्यानंतर १५ राेजी महाशिवरात्रीला दुपारी १२.२५ मूर्तींची स्थापना, संध्याकाळी ७.३० वाजता महाआरती त्यानंतर शिव-पार्वती विवाह साेहळा पार पडला. १६ राेजी २५०० नागरिकांना महाप्रसादचे वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमास उपमहापाैर मनाेज चाैधरी, नगरसेवक डाॅ. चंद्रशेखर पाटील, नगरसेवविका जयश्री पाटील, माजी नगरसेविका प्रतिभा पाटील यांनी भेट दिली. त्यांचा महिला मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.

अशी आहे साई भक्त महिला मंडळची कार्यकारिणी...
मंडळात अध्यक्षा शोभाबाई चौधरी, उपाध्यक्षा वैशाली चौधरी, सचिव प्रमिला कोळी, सदस्य सरोज पाटील, वंदना लोहार, वैशाली ठाकरे, अर्चना गोसावी, शीतल देवरे, दुर्गा पर्वते, संध्या हिवरे, सविता ठाकरे, प्रतिभा गोसावी, माधुरी महाले आदींचा समावेश आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने