जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगावच्या शनिपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने रविवारी पहाटे अकोला येथे मोठी कारवाई केली. व्यापाऱ्याने दाखवलेले प्रसंगावधान आणि पोलिसांनी अवघ्या काही तासांत फिरवलेली तपासचक्रे यामुळे अपहृत तरुणाची सुखरूप सुटका झाली. या कारवाईत पोलिसांनी मुख्य आरोपीसह एका अल्पवयीन मुलालाही बेड्या ठोकल्या आहेत.
खंडणीचा अजब बनाव
ही कारवाई तेव्हा सुरू झाली जेव्हा मोबाईल व्यापारी कृष्णकुमार चौधरी यांनी पोलीस ठाणे गाठून आपबिती सांगितली. आरोपींनी त्यांना आणि त्यांच्या भाच्याला (गणपतलाल माली) अकोल्यात डांबले होते. "भाच्याला जिवंत सोडायचे असेल तर २० लाख रुपये आणून दे," अशी अट घालून आरोपींनी मामा कृष्णकुमार यांना पैशांसाठी जळगावात परत पाठवले होते. मात्र, घाबरून न जाता त्यांनी थेट पोलिसांत धाव घेतली.
या गुन्ह्याची पद्धत अत्यंत धक्कादायक होती. मुख्य संशयित आरोपी यश जितेंद्र माकोडे याने दोघांना शस्त्राचा धाक दाखवून ममुराबाद रस्त्यावरील एका इमारतीत डांबले होते. "तू मला मारण्याची सुपारी दिली आहेस," असा बनाव रचून आरोपीने मामा-भाच्याला दुचाकीवरून अकोल्याला पळवून नेले होते.
घटनेची सुरुवात: 'राजस्थानचे पार्सल'
या संपूर्ण थराराची सुरुवात १५ फेब्रुवारीच्या रात्री झाली. गोलाणी मार्केटमधील व्यापारी कृष्णकुमार आणि गणपतलाल घरी जात असताना, आरोपीने 'तुमचे राजस्थानवरून पार्सल आले आहे' असे खोटे सांगून गणपतलालला ममुराबाद रोडवर बोलावून घेतले होते. तिथूनच या अपहरणाच्या आणि खंडणीच्या नाट्याला सुरुवात झाली होती
टिप्पणी पोस्ट करा