Top News

अजितदादांचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अपूरणीय नुकसान - डॉ. उल्हास पाटील

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातात निधन झाल्याची बातमी अत्यंत धक्का देणारी असून, या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाल्याची भावना माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार हे राजकारणातील स्पष्टवक्ता आणि धडाडीचे नेतृत्व होते. गेल्या चार दशकांपासून त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणावर आपला ठसा उमटविला होता. विविध राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने झालेल्या भेटींमध्ये जळगाव जिल्ह्यातील शेती, सहकार आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी ते आवर्जून माहिती घेत असत, असे डॉ. पाटील यांनी सांगितले.

“सकाळी सहा वाजताच सर्वसामान्य नागरिकांना भेटणारा नेता” अशी अजित पवार यांची ओळख होती. प्रशासनावर मजबूत पकड असलेले आणि निर्णयक्षम नेतृत्व म्हणून दादांकडे पाहिले जात होते. शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी काढलेल्या संघर्ष यात्रेचे नेतृत्व त्यांनी केले होते, याची आठवण डॉ. पाटील यांनी करून दिली.

अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे असून, राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. “दादांसारखे नेतृत्व पुन्हा होणे नाही,” अशा शब्दांत डॉ. उल्हास पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने