जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात घडलेल्या एका अत्यंत धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. गावाजवळील एका विहिरीत दोन अल्पवयीन शाळकरी मुलींचे मृतदेह आढळून आल्याने भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मुली साकरी गावातील रहिवासी असून नियमितपणे शाळेत जात होत्या. आज सकाळी शाळेला जाण्याच्या सुमारास त्यांना गावालगत असलेल्या विहिरीत जबरदस्तीने ढकलण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेला हत्या असल्याचे प्राथमिक तपासात समोर येत आहे.
या प्रकरणात रोहन नरेंद्र चौधरी नावाच्या व्यक्तीवर संशय व्यक्त करण्यात आला असून, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मात्र आरोपीला पोलिसांच्या ताब्यात ठेवण्यात आल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही नागरिकांनी थेट पोलिस ठाण्यात जाऊन आरोपी त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली, तर काहींनी पोलिसांशी वाद घातल्याची माहिती आहे. यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.
दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून तपासाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असला, तरी मृतदेह ताब्यात घेण्यास झालेल्या विलंबामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे. मृतदेह त्वरित ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.
हत्या नेमकी कशामुळे व कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत सध्या अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र या घटनेमुळे साकरी गावासह संपूर्ण भुसावळ तालुक्यात भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण पसरले आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा