Top News

बोगस मतदानाविरोधात कायदेशीर बडगा : प्रभाग ५ मधील दुबार व बनावट मतदारांवर गुन्हे दाखल करणार – ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता धोक्यात आणणाऱ्या आणि लोकशाहीचा गळा आवळणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध आता थेट कायदेशीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये बोगस तसेच दुबार नोंदणी असलेल्या एकाही मतदाराची गय केली जाणार नसून, अशा सर्वांवर कडक कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल केले जातील, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा अपक्ष उमेदवार ॲड. पियूष नरेंद्रअण्णा पाटील यांनी दिला आहे.

नुकतीच प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीच्या पडताळणीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये मोठ्या प्रमाणावर गंभीर त्रुटी आढळून आल्या आहेत. तपासणीदरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या असून, काही मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी किंवा स्वतंत्र प्रभागांमध्ये नोंदवलेली असल्याचे उघड झाले आहे.

याशिवाय संबंधित प्रभागात वास्तव्यास नसतानाही अनेक व्यक्तींची नावे जाणीवपूर्वक मतदार यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. काही ठिकाणी बोगस कागदपत्रांच्या आधारे नवीन मतदार नोंदणी करण्यात आल्याचेही प्राथमिक पुराव्यांवरून स्पष्ट होत आहे.

या संदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रभाग ५-अ चे अपक्ष उमेदवार ॲड. पियूष पाटील यांनी आपली भूमिका ठामपणे मांडली. ते म्हणाले,
“निवडणूक जिंकण्याच्या स्वार्थासाठी बोगस मतदारांची फौज उभी करणे हा लोकशाहीवर घाला आहे. एकाच पत्त्यावर अनेक अनोळखी व्यक्तींची नावे नोंदलेली असणे हा अत्यंत संशयास्पद प्रकार आहे. आम्ही या सर्व नावांची सखोल पडताळणी केली असून, ठोस पुराव्यांसह प्रशासनाकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. जे कोणी बोगस मतदानाचा प्रयत्न करतील, त्यांच्याविरोधात थेट गुन्हा दाखल केला जाईल.”

ॲड. पियूष पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच निवडणूक आयोगाकडे सविस्तर लेखी तक्रारी सादर केल्या आहेत. मतदार यादीतील दुबार नावे तात्काळ वगळावीत, संशयास्पद पत्त्यांवर प्रशासनाने प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करावी, तसेच बोगसगिरी करणारे आणि त्यांना मदत करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेनुसार कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने