सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांच्या पुढाकारातून उपक्रम
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शेगाव वारीच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय कार्यासोबत अध्यात्माची सांगड घालणारा एक प्रेरणादायी उपक्रम अलीकडेच राबविण्यात आला. संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ महाजन यांचे विश्वासू शिलेदार तथा सामाजिक कार्यकर्ते अरविंद देशमुख यांच्या पुढाकारातून हा उपक्रम साकार झाला. निमित्त होते त्यांच्या मातोश्री कै. सौ. सुशीला भगवान देशमुख यांच्या ८५ व्या वाढदिवसाचे.
वाढदिवसाच्या प्रसंगी मातोश्री सुशीला देशमुख यांनी आपल्या मुलाला “सामाजिक आणि राजकीय कार्य करत असताना अध्यात्माकडे कधीही दुर्लक्ष होऊ देऊ नकोस,” असा स्नेहपूर्ण आणि मार्गदर्शक सल्ला दिला. आईच्या या विचारांना मान देत अरविंद देशमुख यांनी आपल्या परिसरातील माता-भगिनींसाठी शेगाव येथील श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची वारी आयोजित करण्याचा संकल्प केला.
आईला दिलेल्या शब्दाची पूर्तता करत अरविंद देशमुख यांच्या पुढाकारातून परिसरातील अनेक माता-भगिनींना शेगाव दर्शनाची सुवर्णसंधी मिळाली. या वारीदरम्यान संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले असून सहभागी महिलांमध्ये समाधान, श्रद्धा आणि आनंदाचे भाव स्पष्टपणे दिसून आले. महिलांनी गजानन महाराजांच्या दर्शनाचा लाभ घेतला आणि अध्यात्मिक समाधान व्यक्त केले.
या प्रसंगी बोलताना अरविंद देशमुख म्हणाले, “मी माता आणि माती — या दोन्हीशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो. आईचे शब्द हेच माझ्यासाठी मार्गदर्शक आहेत.” त्यांच्या या विचारशील भूमिकेचे उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
या कार्यक्रमात हरिभक्त परायण जळकेकर महाराज यांनी प्रवचन करताना देव, देश, धर्म, माता आणि माती या मूल्यांचा सुंदर समन्वय साधला. त्यांच्या ओघवत्या व प्रेरणादायी प्रवचनामुळे उपस्थित महिलांमध्ये भावनिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले.
शेगाव वारीहून परतताना सहभागी माता-भगिनींनी अरविंद देशमुख यांना मनापासून आशीर्वाद दिले. “तू आदर्श मुलाची भूमिका बजावत आहेस,” अशा शब्दांत महिलांनी आपल्या भावना व्यक्त करत या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले.
आईच्या विचारातून साकारलेली ही शेगाव वारी केवळ धार्मिक उपक्रम न राहता सामाजिक संस्कार, अध्यात्मिक जाणीव आणि मूल्यांची जपणूक करणारा एक आदर्श उपक्रम ठरला आहे. समाजाला सकारात्मक संदेश देणाऱ्या या उपक्रमाची परिसरात मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असून नागरिकांकडून त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा