Top News

जळगाव जिल्ह्यात थंडीचा यलो अलर्ट; शाळांची वेळ बदलण्याची शिवसेनेची मागणी

दिपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी प्रशासनाला निवेदन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेली कडाक्याची थंडी, पश्चिमेकडून वाहणारे कोरडे थंड वारे आणि काही ठिकाणी निर्माण झालेली थंडीची लाट लक्षात घेता २० ते २५ डिसेंबरदरम्यान तापमानाची तीव्रता अधिक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. दाट धुके, ५ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरलेले तापमान आणि थंडीचा यलो अलर्ट पाहता शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या सौ. दिपाली भाऊसाहेब सोनवणे यांनी जिल्हाधिकारी आणि आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला जळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील शाळांच्या वेळेत तात्पुरता बदल करण्याची मागणी केली आहे.

सोनवणे यांनी म्हटले की,
“थंडीच्या तीव्रतेमुळे अनेक विद्यार्थ्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्याने त्यांना लवकर थंडीचा त्रास होतो. अत्यंत थंड हवामानात सकाळच्या शाळांमध्ये जाणे विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरू शकते. शाळांना सुट्टी देणे किंवा वेळेत बदल करणे हा पूर्णपणे प्रशासनाचा व आपत्ती व्यवस्थापनाचा निर्णय असला तरी मुलांचे आरोग्य आणि सुरक्षितता जपणे हे शासनाचे कर्तव्य आहे. संविधानाच्या कलम २१ मध्ये दिलेला ‘सुरक्षित जीवनाचा हक्क’ हा यामागील कायदेशीर आधार आहे.”

तसेच, सध्या हवामानातील तीव्र बदलामुळे पालकांमध्येही चिंता वाढली असून सकाळच्या चटई-गुलाबी थंडीत विद्यार्थ्यांना होणाऱ्या त्रासाची दखल प्रशासनाने घ्यावी, अशीही विनंती सोनवणे यांनी केली.

या निवेदनावेळी शिवसेना तालुका प्रमुख प्रमोदभाऊ घुगे, किरण ठाकूर, सुनिता सपकाळे, नारायण कोळी व भाऊसाहेब सोनवणे उपस्थित होते.

जिल्ह्यातील विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. आता प्रशासन यावर कोणती पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने