Top News

पोलिसांच्या वेशातील सायबर भामट्यांकडून ८६ वर्षीय निवृत्ताची ८० लाखांची फसवणूक

पॉर्नोग्राफी, मनी लाँड्रिंग व अतिरेक्यांना पैसे दिल्याची धमकी देत उकळले पैसे

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गोरगरिबांची फसवणूक, मनी लाँड्रिंग तसेच अतिरेक्यांना पैसे दिल्याच्या खोट्या आरोपाखाली अडकवून पोलिसांच्या वेशात धमकावत सायबर भामट्यांनी ८६ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्याकडून तब्बल ८० लाख ५ हजार ४१६ रुपये उकळल्याची धक्कादायक घटना भुसावळ येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी सुकदेव पांडुरंग चौधरी यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातून (एमएसईबी) सेवानिवृत्त झालेले सुकदेव पांडुरंग चौधरी (वय ८६, रा. भुसावळ) यांना २७ ऑक्टोबर रोजी एका अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला. कॉल करणाऱ्याने आपण डेटा प्रोटेक्शन बोर्ड ऑफ इंडिया येथून बोलत असल्याचे सांगत, चौधरी यांच्या नावावर अनेक बनावट मोबाइल क्रमांक असल्याचा दावा केला. या क्रमांकांद्वारे मोठ्या प्रमाणात फसवणूक होत असल्याचे सांगून त्यांना भीतीच्या वातावरणात आणले.

यानंतर त्यांना व्हिडिओ कॉल करण्यात आला. व्हिडिओ कॉलवर समोरचा व्यक्ती पोलिस गणवेशात असल्याचे दिसून आले. त्याने चौधरी यांच्याविरोधात कुलाबा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले. या प्रकरणात तातडीने सहकार्य न केल्यास अटक होऊ शकते, अशी धमकी देण्यात आली.

बँक व्हेरिफिकेशनच्या नावाखाली लाखो रुपये उकळले
२८ ऑक्टोबर रोजी पुन्हा चौधरी यांना फोन आला. या वेळी पॉर्नोग्राफी व्हिडिओ पाहणे तसेच अतिरेक्यांकडून पैसे घेणे अशा गंभीर आरोपांचा उल्लेख करण्यात आला. या गुन्ह्यांतून सुटका करून घेण्यासाठी बँक खात्याची पडताळणी (व्हेरिफिकेशन) आवश्यक असल्याचे सांगत, विविध खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्यास भाग पाडण्यात आले.

घाबरलेल्या चौधरी यांनी टप्प्याटप्प्याने मोठी रक्कम पाठविली.

६ नोव्हेंबर रोजी: ३८ लाख २५ हजार २०८ रुपये

१० नोव्हेंबर रोजी: २१ लाख १० हजार २०८ रुपये

५ डिसेंबर रोजी: २० लाख रुपये

अशा प्रकारे एकूण ८० लाख ५ हजार ४१६ रुपये सायबर भामट्यांनी उकळले. पैसे पाठविल्यानंतर अचानक कॉल येणे बंद झाले.

‘अतिरेक्यांना पैसे दिले’ अशी धमकी
आपल्याकडे एकच सिम कार्ड असल्याचे चौधरी यांनी सांगितल्यानंतर भामट्यांनी भूमिका बदलली. तुम्ही निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यासाठी पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट देऊ, असे सांगून त्यांच्याकडून आधार कार्डचा फोटो मोबाइलवर मागविण्यात आला. मात्र, काही वेळातच तुमच्या नावावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा असून दोन कोटी रुपयांचा व्यवहार अतिरेक्यांकडे गेल्याचे आढळले आहे, त्यामुळे प्रमाणपत्र देता येणार नाही, असे सांगून पुन्हा धमकावण्यात आले.

कॉल बंद झाल्यानंतर चौधरी यांनी हा प्रकार नातेवाइकांना सांगितला. त्यानंतर आपण सायबर फसवणुकीचे बळी ठरल्याचे लक्षात आले. तातडीने सायबर पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल करण्यात आली.

सायबर पोलिसांचा तपास सुरू
या प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून अनोळखी मोबाइल क्रमांक, बँक खाती व डिजिटल व्यवहारांचा तपास सुरू केला आहे. वरिष्ठ नागरिकांनी अशा प्रकारच्या फोन कॉल्सपासून सावध राहावे, कोणतीही वैयक्तिक किंवा बँक माहिती फोनवरून देऊ नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने