Top News

गोवंश कत्तलीच्या वादातून तरुणांवर जीवघेणा हल्ला; दोघे गंभीर जखमी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चोपडा तालुक्यातील लोणी येथे गोवंश कत्तलीच्या संशयित माहितीवरून गेलेल्या काही कार्यकर्त्यांवर स्थानिक गटाकडून प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना गुरुवार, दि. ११ डिसेंबर रोजी रात्री सुमारे ८ वाजता घडली. या हल्ल्यात दोन जण गंभीर जखमी असून त्यांना तात्काळ जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेनंतर रुग्णालय परिसरात मोठी गर्दी उसळली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जामनेर येथील कृष्णा भिल (१८) आणि जळगाव येथील योगेश महाराज कोळी (३५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा भिल याला लोणी गावात गोवंश कत्तल होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर तो, योगेश कोळी आणि त्यांचे काही सहकारी मिळून लोणी येथे गेले. त्यांनी तेथे सुरू असलेल्या कत्तलीला विरोध करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. यावेळी काही स्थानिकांनी त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली आणि त्यानंतर मारहाण केली. काहीजणांनी चॉपर, कोयते आणि लोखंडी दांड्यांसारख्या हत्यारांसह हल्ला चढवला. या हल्ल्यात योगेश कोळी यांच्या मांडीवर चॉपरने गंभीर वार करण्यात आला, तर कृष्णा भिललाही मारहाण होऊन गंभीर दुखापत झाली.

रुग्णालयात मोठी गर्दी; पोलिसांची माहिती घेत तपास सुरू
हल्ल्यानंतर दोघांनाही तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. येथे उपचार सुरू असताना विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली असून हल्लेखोरांविरुद्धचा तपास सुरू आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने