जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I इंस्टाग्रामवर काही तरुणांना शिवीगाळ करणारा व्हिडिओ पोस्ट केल्याच्या वादातून जळगाव येथील 18 वर्षीय तुषार चंद्रकांत तायडे याची हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. हा प्रकार 2 डिसेंबरच्या सायंकाळी यावल–शेळगाव बॅरेज रस्त्यावर घडला. गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या तुषारचा 3 डिसेंबरच्या मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
प्रकार कसा घडला?
तुषार तायडे याने काही दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर शिवीगाळ करणारा व्हिडिओ टाकला होता. हा व्हिडिओ मनावर घेत आरोपींनी तुषारवर हल्ला केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तुषार आपल्या नातेवाईकाच्या अंत्यविधीतून मित्राच्या दुचाकीवरून जळगावला परतत असताना यावल–बोरावल मार्गावरील शेळगाव बॅरेजजवळ त्याचा रस्ता अडवण्यात आला.
त्यानंतर आठ ते नऊ जणांनी तुषारला लाथाबुक्क्यांनी तसेच लाकडी काठ्यांनी मारहाण केली. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र स्थिती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी तुषारचे वडील चंद्रकांत तायडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात विरुद्ध यावल पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवला आहे. दरम्यान, तुषारच्या कुटुंबियांनी जिल्हा रुग्णालयात मोठा आक्रोश करत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
टिप्पणी पोस्ट करा