Top News

भादली बु. ग्रामस्थांकडून अमानवीय घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी नशिराबाद पोलीस स्थानकात निवेदन

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I मालेगावमध्ये तीन वर्षांची चिमुरडी यज्ञा हिच्या विषयी घडलेल्या अमानवीय अत्याचार व हत्येने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे. आरोपी विजय खैरनार याला मालेगाव अप्पर जिल्हा न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. अशा प्रकारच्या अमानवीय घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी सुरू आहे.

याच पार्श्वभूमीवर भादली बु. गावातील ग्रामस्थ व अखिल हिंदुराष्ट्र सेना तर्फे आज दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे निवेदन सादर करण्यात आले. समाजातील घडणाऱ्या अशा अमानवीय गुन्ह्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी तसेच पोलीस गस्त (राऊंड) नियमित ठेवण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.

गेल्या वर्षी भादली बु. गावात एका विशेष समुदायातील व्यक्तीने गाईवर केलेल्या अमानवी कृत्याची आठवण ग्रामस्थांनी करून दिली. अशा घटनांचा पुनरुच्चार होऊ नये यासाठी कायद्याचा धाक कायम ठेवण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

यावेळी पोलिसांनी कार्यक्षमतेने केलेल्या कामाचे कौतुक करण्यात आले. तसेच गरज भासल्यास गावातून धावत्या फेऱ्या व्हाव्यात आणि कायद्याची अंमलबजावणी अधिक मजबूत करावी, अशी विनंती करण्यात आली.

या निवेदनावर खुशाल (जितू) डिगंबर नारखेडे, अध्यक्ष - अखिल हिंदुराष्ट्र सेना, भादली बु. व ग्रामपंचायत सदस्य निर्मल डिगंबर नारखेडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाला समस्त ग्रामस्थ, सर्व स्वायत्त संस्था, महात्मा गांधी विद्यालयाचे आजी-माजी शिक्षक यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे कळविण्यात आले. ग्रामस्थांनी या अमानुष कृत्याचा जाहीर निषेध नोंदवत आरोपीस फाशीची शिक्षा द्यावी, अशी ठाम मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने