Top News

सेंट टेरेसा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा राज्यात डंका, सर्वस्तरावरून विद्यार्थ्याचे कौतुक

विद्यार्थी रिशीत भारुळे यांच्यासह परिवाराचा विद्यालयाच्या मुख्याध्यपिकेच्या हस्ते सत्कार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I सेंट टेरेसा कॉन्व्हेन्ट हायर सेकंडरी विद्यालयात नुकताच विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय यशाचा गौरव करण्यासाठी भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. भारत सरकार, दिल्ली तसेच नवोदय विद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित भारत’ या विषयावर आधारित ‘अनुभवात्मक ज्ञान शिक्षण’ प्रेरणा महोत्सव ३१ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबरदरम्यान गुजरातमधील वडनगर येथे पार पडला होता. या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय उपक्रमासाठी सेंट टेरेसा इंग्लिश मीडियम स्कूलचा विद्यार्थी रिशीत गणेश भारुळे व या. दे. पाटील विद्यालयाची विद्यार्थिनी सुश्मिता काशीराम सोनोने यांची निवड झाली होती.
राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्याबद्दल आणि प्रेरणा महोत्सवातील उत्कृष्ट सहभागाबद्दल दोन्ही विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यासाठी विद्यालयात आयोजित समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलीट, उपमुख्याध्यापिका सिस्टर डेलला तसेच शाळेतील शिक्षकवर्ग उपस्थित होता. मुख्याध्यापिका सिस्टर ज्युलीट यांच्या हस्ते रिशीत भारुळे यांचा शाल, पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी विद्यार्थी रिशीत भारुळे, सिस्टर ज्युलीट तसेच विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रेरणा महोत्सवातील अनुभव, मिळालेली मूल्यवान शिकवण आणि विद्यालयाने दिलेल्या पाठींब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

राष्ट्रीय स्तरावर विद्यार्थ्यांची निवड होणे ही विद्यालयासाठी अभिमानाची बाब ठरली असून उपस्थितांनी दोन्ही विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. विशेष म्हणजे, विद्यार्थी रिशीत गणेश भारुळे यांनी देशातील १० राज्यांमध्ये सहभाग घेऊन मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावला आहे. आपल्या मनोगतात रिशीतने – “विकसित भारताच्या निर्मितीत माझे योगदान सदैव राहील,” असे आत्मीयतेने सांगितले. सत्कार समारंभासाठी शिक्षकवर्ग, विद्यार्थी व रिशीतचे पालक डॉ. गणेश भारुळे, सुवर्णा भारुळे उपस्थित होते. या राष्ट्रीय यशामुळे विद्यालयाचा गौरव द्विगुणित झाला असून विद्यार्थ्यांची कामगिरी इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने