🧊 उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा प्रभाव – सकाळी धुक्याची चादर, शाळकरी मुलं व वृद्धांना त्रास वाढला, नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट होत असल्याने थंडीचा कडाका वाढला आहे. रविवारी (दि. १० नोव्हेंबर) सकाळी जिल्ह्यातील किमान तापमान १०.५ अंश सेल्सियस इतके नोंदवले गेले. गेल्या २४ तासांत तब्बल ५ अंशांनी तापमान घसरल्याने नागरिकांनी उबदार कपड्यांचा आणि शेकोटीचा आधार घेतला आहे.
राज्यातील उत्तरेकडील वारे वेगाने वाहत असल्याने जळगाव, धुळे, भुसावळ परिसरात थंडीची झळ स्पष्टपणे जाणवत आहे. सकाळच्या वेळेत धुक्याचे प्रमाण वाढले असून, शाळकरी मुले व वृद्ध नागरिकांना या थंडीचा विशेष त्रास होत आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, जिल्ह्यात हिवाळ्याची चाहूल अधिक तीव्र होणार आहे. दिवसा तापमान थोडे वाढले तरी सकाळी व रात्रीच्या थंडीत फरक पडणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान, थंडीमुळे ग्रामीण भागात कामगार वर्गाने सकाळी उशिरा कामावर जाण्याचा पर्याय निवडला आहे. शेतकऱ्यांनी शेतातील पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. वैद्यकीय तज्ञांनी या काळात उबदार कपडे वापरणे, गरम पाण्याचे सेवन करणे आणि थंड वाऱ्यापासून स्वतःचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.
थंडीचा हा अचानक वाढलेला कडाका पाहता नागरिकांनी सावधगिरी बाळगणे आवश्यक असून, हिवाळ्याचा हंगाम लांबणार असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सूचित केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा