🛑 राजधानी हादरली; स्फोटानंतर परिसरात घबराट, सुरक्षा यंत्रणा सतर्क, अनेक जण जखमी
दिल्ली, वृत्तसेवा I राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात आज सायंकाळी भीषण स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक एकजवळ उभ्या असलेल्या कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोट एवढा तीव्र होता की आसपासच्या इमारतींच्या काचा फुटल्या आणि दोन शेजारच्या वाहनांना आग लागली.
साक्षीदारांच्या माहितीनुसार, स्फोटानंतर काही क्षण परिसरात दाट धुराचे लोट दिसून आले आणि लोक घाबरून धावाधाव करू लागले. काही वेळातच घटनास्थळी मोठी गर्दी जमली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत गर्दी हटवून परिसर सील केला.
🔥 परिस्थिती नियंत्रणात, तरीही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
स्फोटानंतर लगेचच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि लागलेली आग नियंत्रणात आणली. स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून आणखी काही जखमी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
🔍 घातपात की अपघात? तपास सुरू
स्फोटाचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. बॉम्ब शोधक पथक (Bomb Disposal Squad) आणि फॉरेन्सिक टीमने घटनास्थळी तपास सुरू केला आहे. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार कारमध्ये तांत्रिक बिघाडामुळे स्फोट झाला असावा, परंतु घातपाताची शक्यता नाकारली गेलेली नाही. दिल्ली पोलिस आयुक्तांनी सांगितले की, “स्फोटाचे कारण निश्चित करण्यासाठी तपास सुरू असून सर्व शक्य कोनातून चौकशी केली जात आहे.”
🚨 फरिदाबाद प्रकरणाशी संबंध आहे का?
या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी हरियाणातील फरिदाबादमध्ये एका डॉक्टरच्या घरातून मोठ्या प्रमाणात स्फोटकं आणि दोन एके-४७ रायफल्स जप्त झाल्याची घटना ताजी आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी या कारवाईत तब्बल ३०० किलो आरडीएक्स हस्तगत केले होते. त्यामुळे दिल्लीत झालेल्या या स्फोटानंतर विविध चर्चांना ऊत आला आहे.
👉 पुढील कारवाई
सध्या पोलिसांनी परिसर पूर्णतः बंद केला असून, सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. स्थानिक नागरिकांना संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा