मेहरूण तलावाजवळ सकाळी फिरायला गेले असता अचानक तब्येत बिघडली; आत्महत्येच्या चर्चेला उधाण
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जामनेर तालुक्यातील प्रसिद्ध शिक्षणसंस्था प्रकाशचंद्र जैन बहुउद्देशीय संस्थेचे चेअरमन राजकुमार कावडिया (वय ५५) यांचा आज, सोमवार दि. १० नोव्हेंबर रोजी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मेहरूण तलावाजवळ संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राजकुमार कावडिया हे दररोजप्रमाणे आज सकाळी फिरण्यासाठी मेहरूण तलाव परिसरात गेले होते. फिरत असताना त्यांना अचानक छातीत तीव्र दुखू लागल्याने ते कोसळले. तत्काळ उपस्थित नागरिकांनी त्यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान सकाळी सुमारे साडेनऊच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, कावडिया यांच्या मृत्यूमागे आत्महत्येचा संशयही व्यक्त केला जात आहे. पोलिस सूत्रांनुसार, त्यांनी विषप्राशन केल्याची चर्चा असून, मृत्यूपूर्वी चिठ्ठी लिहिल्याचंही बोललं जात आहे. तथापि, या दोन्ही बाबींवर पोलिस किंवा कुटुंबीयांकडून अद्याप अधिकृत पुष्टी मिळालेली नाही. एमआयडीसी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून राजकुमार कावडिया यांच्या प्रकाशचंद्र जैन संस्थेच्या आयुर्वेदिक, फिजिओथेरपी व होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयावर प्रशासकीय कारवाई सुरू होती. या महाविद्यालयाची मान्यता रद्द करण्यात आली होती तसेच इमारत अतिक्रमणात असल्याचे सांगण्यात आले होते. प्रशासनाने मंगळवारी म्हणजेच उद्या या इमारतीचे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते.
या कारवाईच्या पार्श्वभूमीवर कावडिया मानसिक तणावाखाली असल्याचे जवळच्या सूत्रांनी सांगितले. त्यामुळे त्यांच्या मृत्यूमुळे विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. त्यांच्या पत्नी आणि मुलाने रुग्णालयातच हंबरडा फोडल्याने वातावरण हळहळून गेले.
पोलीस उपनिरीक्षकांनी सांगितले की, “आकस्मात मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. चिठ्ठीबाबत तपास सुरू आहे.”
या घटनेमुळे जामनेर आणि जळगाव परिसरात हळहळ व संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील मान्यवर व्यक्तींनी कावडिया यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा