Top News

जगातील प्रभावशाली नेतृत्त्व म्हणजे गांधी विचार - डॉ. के. बी. पाटील

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिराचा समारोप

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राष्ट्रपिता महात्मा गांधीजींकडे शरिरयष्टी, पद, सत्ता किंवा वकृत्व सुद्धा म्हणावे तसे प्रभावशाली नव्हते, तरीसुद्धा जगातील प्रभावी नेतृत्त्व म्हणून त्यांच्याकडे संपूर्ण जग अग्रक्रमाने पाहते. याचे कारण आजच्या तरूणांनी शोधले पाहिजे. प्रत्येकात असलेल्या वेगळेपणाला गांधीजींनी महत्त्व दिले. गांधीजींप्रमाणे जीवनशैली आजच्या युगात जगणे शक्य नसेलही मात्र त्यांचे सत्य, अहिंसा, अपरिग्रहाचे विचार आपल्या आचरणात आणले पाहिजे. यातूनच सशक्त समाजाची निर्मिती होईल, यासाठी ‘नागरिकता’ ही संकल्पना स्वत: तपासून घ्यावी, त्यासाठी तरूणांनी पुढे यावे; असे आवाहन 

अध्यक्षीय मनोगतामध्ये गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त तथा कबचौउत्तर महाराष्ट्र विद्यापिठाचे माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील यांनी केले.

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या नॅशनल गांधीयन लीडरशिप शिबिर-२०२५ च्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. जैन हिल्सच्या परिश्रम हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर फाऊंडेशनचे विश्वस्त व जैन इरिगेशन सिस्टिम्सचे अध्यक्ष अशोक जैन, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन अय्यंगार, रामदत्त त्रिपाठी, अंबिका जैन उपस्थित होते. त्यांच्यासह यावेळी संस्थेच्या संशोधन विभागाच्या अधिष्ठाता डॉ. गीता धर्मपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, समन्वयक उदय महाजन, सुधीर पाटील यांचीही उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सहभागींना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. 

राजस्थान, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, छत्तीसगढ, महाराष्ट्र, त्रिपूरा, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, दिल्ली अशा १६ राज्यांतून अभ्यासकांनी या नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प-२०२५ मध्ये सहभाग घेतला. १२ दिवस चाललेल्या या शिबिरांमध्ये झालेल्या उपक्रमांवर आधारित एक बुलेटियन प्रकाशित करण्यात आली. त्याचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते झाले. सादरीकरणातून रूपक, आयुष, नवीना यांनी शिबिरातून श्रम, गांधीकथेतून सत्य, अहिंसा, सत्याग्रहातून चारित्र्य निर्माण करणे, योग्य माध्यमांचा वापर, स्वत: मधील नकारात्मकता दूर करुन समाजासाठी विधायक कार्यातून पुढे कसे जाता येईल यासाठी महात्मा गांधीजींचा आजची आवश्यकता, भारत की संतान, विविधेतून एकात्मकता असे गुण संस्कारीत झाल्याचे म्हटले. सतिष चौरसिया, करुणा, प्रज्ज्वल, जिया यांनी सुद्धा आपले अनुभव व्यक्त केले.

रामदत्त त्रिपाठी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, श्रद्धेय भवरलाल जैन यांच्या विचारातून कृषीक्षेत्रात आमूलाग्र बदल घडविणारे कार्य जैन हिल्सच्या भूमितून सुरू आहे. यातून ग्रामद्योगासाठी खूप चालना मिळते. महात्मा गांधीजींच्या विचारातूनच आजती पिढी घडली पाहिजे तर जगाचे भविष्य आहे असेही ते यावेळी म्हणाले. अंबिका जैन यांनी (3-H) हार्ट, हॅन्ड आणि हेड यातून महात्मा गांधीजींना समजून घेताना बालवयातच सत्य, अहिंसा, विश्वस्तशीप हे गुण संस्कारीत केले तर शांतताप्रिय समाजाची निर्मिती होईल असे सांगितले. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे ग्रामद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचेही त्या म्हणाल्यात.

प्रशांत सूर्यवंशी यांनी सब के लिए खुला… हे संत तुकडोजी महाराज यांचे भजन म्हटले. डॉ. अश्विन झाला यांनी सूत्रसंचालन केले. दीपक मिश्रा यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.

मानवतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशन अर्पण - अशोक जैन
गांधी रिसर्च फाऊंडेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी प्रश्नोत्तरांद्वारे संवाद साधला. प्रत्येक पिढीमध्ये महात्मा गांधीजींचे विचार गांधी रिसर्च फाऊंडेशन पोहचवत आहे. वडील श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्यावर त्यांचे आई-वडील-पत्नी यांच्यासह महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, जे आर डी टाटा यांचा प्रभाव होता. त्याच विचारांतून मानवतेसाठी कार्य करणाऱ्या गांधी रिसर्च फाऊंडेशनची निर्मिती झाली. त्यांचा आदर्श वारसा घेऊन गांधी विचारांचे प्रचार प्रसाराचे कार्य सुरू असून ते भविष्यात आणखी जोमाने पुढे नेता येईल. ‘सार्थक करुया जन्माचे रुप पालटू वसुंधरेचे’ या संकल्पनेवर शिक्षण, क्रीडा, आरोग्य, ग्रामोद्योगासह शक्य तिथे चांगले करण्याचा प्रयत्न असल्याचे अशोक जैन म्हणाले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने