जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I शहरालगतच्या ममुराबाद रस्त्यावरील फार्म हाऊसवर चालविण्यात येणाऱ्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करून पोलिसांनी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतर आरोपींना यापूर्वीच अटक केली होती. या प्रकरणात आता मुख्य सूत्रधार पोलिसांच्या ताब्यात आल्याने तपासाला वेग आला आहे. यामुळे कोल्हे यांच्यावरील अडचणींमध्ये आणखी भर पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे २८ सप्टेंबर रोजी एल.के. फार्म हाऊसवर छापा टाकण्यात आला. कारवाईदरम्यान कॉल सेंटरचे ३१ लॅपटॉप आणि अत्याधुनिक उपकरणे जप्त झाली. प्राथमिक तपासात विदेशी नागरिकांची आर्थिक फसवणूक हे या रॅकेटचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट झाले. कॉल सेंटरमधील कर्मचारी स्वतःला अधिकृत संस्था अथवा सरकारी प्रतिनिधी असल्याचे भासवून विविध आमिषे दाखवून परदेशी नागरिकांना जाळ्यात ओढत होते. दोन लॅपटॉपवर संशयास्पद आर्थिक व्यवहारांचे पुरावेही मिळाले.
दरम्यान, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार अकबर खान उर्फ अयान खान रौनकअली खान (४०) आणि त्याचा साथीदार आदिल सय्यद निसार अहमद सय्यद (३०) यांना स्थानिक गुन्हे शाखा आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या संयुक्त पथकाने मुंबईतील एका फ्लॅटमधून जेरबंद केले. शनिवारी दोघांना जळगावात आणून न्यायालयासमोर हजर केले असता, २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईनंतर गुन्ह्यातील अटक संशयितांची एकूण संख्या १० वर पोहोचली आहे.
कसे लागले हाती?
अकबर, आदिल आणि ऋषी यांचा शोध घेत पोलिसांनी अनेकदा मुंबईच्या फेऱ्या मारल्या, मात्र तिघांचा ठावठिकाणा लागत नव्हता. या दरम्यान इम्रान नावाचा संशयित मात्र पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून मिळालेल्या धाग्यांवरून आणि मुंबईतील अनुभवी अधिकाऱ्यांच्या मदतीने संशयित एका उपनगरातील फ्लॅटमध्ये लपल्याची माहिती मिळाली. पोलिसांचे पथक तत्काळ मुंबईत रवाना झाले आणि अखेर अकबर व आदिलला ताब्यात घेतले.
मुख्य सूत्रधार पकडल्याने आता या प्रकरणामागील आंतरराष्ट्रीय रॅकेट, विदेशी नागरिकांची फसवणूक करून जमा झालेली रक्कम कोणाच्या खात्यांमध्ये गेली आणि गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे याचा तपास अधिक सखोल होणार आहे.
टिप्पणी पोस्ट करा