जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शाहिरी क्षेत्र, संघटन, सार्वजनिक कार्य आणि पत्रकारिता या माध्यमांतून साठ वर्षांहून अधिक काळ निस्वार्थ भावनेने कार्यरत राहिलेल्या अखिल भारतीय मराठी शाहीर परिषदेचे संस्थापक व मुख्य विश्वस्त शाहीर रमेश कदम यांना पहिला ‘खान्देश रत्न - राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे जीवन गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
हा सन्मान खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान, जळगाव यांच्या वतीने देण्यात आला असून पुरस्कारामध्ये रुपये ५१,०००, शाल, श्रीफळ, मानपत्र व सन्मानचिन्ह असा समावेश आहे. हा पुरस्कार अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद व खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी शाहीर लोककलाकार संमेलनात प्रदान करण्यात आला. हा सोहळा जळगाव येथील माजी सैनिक सभागृहात पार पडला. पुरस्कार वितरण सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून स्मितोदय फाऊंडेशनच्या अध्यक्षा भैरवी पलांडे-वाघ व जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. शाहीर देवानंद माळी (कार्याध्यक्ष, अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद) होते. प्रास्ताविक शाहीर विनोद ढगे (प्रमुख कार्यवाह) यांनी केले. या प्रसंगी पुरस्कारप्राप्त श्री रमेश कदम यांनी शाहीर परिषदेच्या ३५ वर्षांच्या कार्याचा आढावा घेत शाहीर लोककलावंतांच्या न्यायहक्कासाठी परिषदेने लढविलेल्या जनआंदोलनांची माहिती उपस्थितांना दिली.
त्यांनी सांगितले की, “आता संस्थेची धुरा तरुणांच्या—शाहीर देवानंद माळी आणि शाहीर विनोद ढगे—सारख्या कार्यतत्पर व्यक्तींच्या हातात सोपवण्याची वेळ आली आहे. शरीर थकले असले तरी मनाने आणि आत्म्याने मी अखेरच्या श्वासापर्यंत या परिषदेबरोबर राहीन.”
अध्यक्षीय भाषणात शाहीर देवानंद माळी यांनी सांगितले की, परिषदेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेऊन शाहिरी लोककलेचे जतन, संवर्धन आणि लोककलावंतांच्या न्यायहक्कासाठी लढण्याचे कार्य पुढेही चालू राहील.
या संमेलनात राज्यभरातील विविध जिल्ह्यांतील शाहीर परिषदेचे पदाधिकारी व लोककलावंत मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांमध्ये शाहीर भिकाजी भोसले, शाहीर राणा जोगदंड, शाहीर आसनगावकर, शाहीर आप्पासाहेब उगले, शाहीर धनवटे, शाहीर खांदेभराड, शाहीर अरविंद जगताप, शाहीर आप्पा खताळ, शाहीर विश्वास कांबळे, श्रीमती नंदा पुणेकर आदींचा समावेश होता. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन शाहीर सचिन महाजन (समन्वयक, खान्देश लोककलावंत विकास प्रतिष्ठान) यांनी केले. संमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी मोहित पाटील, संतोष चौधरी, भिकाभाऊ धनगर, आकाश भावसार, अवधूत दलाल, अरविंद पाटील, गोकुळ चौधरी आदींनी परिश्रम घेतले.
भव्य लोककला शोभायात्रा
संमेलनाच्या निमित्ताने जळगाव शहरात पारंपारिक लोककलेची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यान येथून शाहीर देवानंद माळी यांच्या हस्ते शोभायात्रेला सुरुवात झाली. राष्ट्रध्वजासमोर राष्ट्रशाहीर सिद्राम बसप्पा मुचाटे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उद्घाटन झाले. शाहीर विनोद ढगे यांनी महाराष्ट्र गीत सादर केले. शोभायात्रेत खान्देशातील शाहीर, वहीगायक, वाघ्या-मुरळी, गोंधळी, टिंगरी वादक आणि विविध लोककलाप्रकारातील कलावंतांनी सहभाग घेत आपल्या कलांचे सादरीकरण केले. ही शोभायात्रा माजी सैनिक सभागृहात येऊन मुख्य संमेलनात परिवर्तीत झाली.
रमेश कदम यांचा परिचय :
आचार्य अत्रे आणि शाहीर अमर शेख या दोन थोर व्यक्तींचे विचार त्यांच्या कार्याचे प्रेरणास्थान आहेत. त्यांची घडण राष्ट्र सेवा दलात झाली.
वयाच्या केवळ १२व्या वर्षी त्यांनी लेखनास प्रारंभ केला आणि नंतर दैनिक मराठा मध्ये लेखन केले. वयाच्या २५व्या वर्षी स्वतःचे ‘समर्पित’ हे साप्ताहिक सुरू करून प्रबोधन, अन्याय निवारण, ग्रामविकास, युवक चळवळ आणि स्त्रीमुक्ती आंदोलनासाठी सक्रिय योगदान दिले. ते अखिल भारतीय मराठी शाहीर परिषद, शाहीर अमरशेख पुरस्कार समिती, शाहीर साबळे प्रतिष्ठान, मराठी लोककला प्रतिष्ठान, भारतीय नृत्यकला प्रतिष्ठान, महानगर कामगार परिषद या अनेक संस्थांचे संस्थापक आहेत. शाहिरी अधिवेशन, अभ्यास शिबिरे, लोककलावंतांच्या प्रश्नांवरील जनआंदोलने आणि लोककलेच्या जतनासाठी त्यांनी दिलेले योगदान अतुलनीय आहे.
टिप्पणी पोस्ट करा