Top News

एमआयडीसीतील गॅस सिलेंडर चोरी प्रकरणी पर्दाफाश, ६१ सिलेंडर व आयशर वाहन जप्त – दोघांना गजाआड

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत झालेल्या गॅस सिलेंडर चोरी प्रकरणाचा अखेर एमआयडीसी पोलिसांनी यशस्वी तपास करून छडा लावला आहे. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले ६१ सिलेंडर तसेच गुन्ह्यात वापरलेले आयशर वाहन असा एकूण ६ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी शुक्रवारी (दि.१४) भारत पेट्रोलियम, जळगाव येथून रिफिल केलेले ३४२ सिलेंडर ट्रकद्वारे एमआयडीसी परिसरात पार्क केले होते. मात्र, शनिवारी (दि.१५) सकाळी ट्रक घेण्यासाठी आल्यानंतर त्यातील ६१ सिलेंडर चोरीस गेल्याचे आढळले. या सिलेंडरची किंमत सुमारे १ लाख २२ हजार रुपये होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गु.र.नं. ८४८/२०२५, कलम ३०३(२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने तातडीने तपास सुरू केला. गुप्त माहितीच्या आधारे मंगळवारी (दि.१८) एमआयडीसी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी शेख फिरोज शेख याकुब (रा. नशिराबाद, जळगाव) याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने साथीदार सैय्यद मुश्ताक सैय्यद अशपाक (रा. उस्मानिया पार्क, जळगाव) याच्यासोबत चोरी केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून सर्व ६१ सिलेंडर तसेच सुमारे ५ लाख रुपये किमतीचे आयशर वाहन जप्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत पोलीस कर्मचारी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, विजयसिंग पाटील, गणेश शिरसाळे, प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद, किरण चौधरी, नितीन ठाकुर, किरण पाटील आणि शशिकांत मराठे यांचे विशेष योगदान राहिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने