चाळीसगाव, निखिल वाणी | भारतीय जनता पक्षाने चाळीसगाव नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदासाठी सौ. प्रतिभा मंगेश चव्हाण यांची अधिकृत उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज शहरात भव्य शक्तिप्रदर्शन पाहायला मिळाले. छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदान येथे आयोजित जाहीर सभेत तसेच शहरातून निघालेल्या भव्य रॅलीत शिवसेनेचा उत्साह, ढोल-ताशे, घोषणाबाजी आणि पक्षकार्यकर्त्यांची प्रचंड उपस्थिती पाहायला मिळाली. याच कार्यक्रमात नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदासाठी भाजप उमेदवारांचे ३६ अर्ज दाखल करण्यात आले.
मोठ्या नेत्यांची उपस्थिती
या जाहीर सभेला माजी केंद्रीय मंत्री एम.के. अण्णा पाटील, माजी आमदार साहेबरावजी घोडे, आमदार मंगेश चव्हाण, भाजपा पश्चिम जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी यांच्यासह शहर व ग्रामीण भागातील आजी-माजी लोकप्रतिनिधी, प्रदेश व जिल्हा पदाधिकारी, मंडळ अध्यक्ष आणि मोठ्या संख्येने पक्षकार्यकर्ते उपस्थित होते. कार्यकर्त्यांच्या उत्साहाने संपूर्ण परिसर दणाणून गेला.
रॅलीतून शक्तिप्रदर्शन
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शहरातून वाजत-गाजत भव्य रॅली काढण्यात आली. मोटारसायकल मिरवणूक, पक्षध्वजांनी सजलेली वाहने आणि घोषणांनी परिसरात निवडणूक वातावरण अधिक तापवले. रॅलीतून सर्व उमेदवारांनी सभा स्थळ गाठले.
कुलदैवतांचे दर्शन घेऊन प्रचाराची सुरुवात
सभेपूर्वी सौ. प्रतिभा चव्हाण यांनी आपल्या शिवनेरी निवासस्थानी कुलदैवतांचे दर्शन घेत मनोभावे आशिर्वाद घेतले. त्यानंतर त्यांनी दुचाकीवरूनच शहरात भ्रमंती करत महापुरुषांच्या स्मारकांना विनम्र अभिवादन केले.
महापुरुषांना अभिवादन
प्रचाराची सुरुवात करताना त्यांनी शहरातील —
छत्रपती शिवाजी महाराज,
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर,
संत जगनाडे महाराज,
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,
महात्मा जोतीबा फुले,
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,
तसेच वीर भाई कोतवाल —
यांच्या स्मारकांना पुष्प अर्पण करून जनसेवेच्या नव्या जबाबदारीसाठी प्रेरणा घेतली.
उमेदवारीसोबतच दाखल झालेले एकूण ३६ उमेदवारांचे अर्ज, मोठ्या नेत्यांची उपस्थिती आणि भव्य रॅलीमुळे चाळीसगावमध्ये भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीचा मजबूत संदेश यानिमित्ताने देण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा