जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून वाढत्या लाचलुचपत प्रकरणांमध्ये आता आणखी एका अधिकाऱ्याची भर पडली आहे. भुसावळजवळील दीपनगर येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात कार्यरत असलेले अधीक्षक अभियंता भानुदास पुंडलिक लांडवंजारी (वय ५७, रा. नेहरुनगर, जळगाव) यांना आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पाच हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
तक्रारदाराचे विद्युत बिल दुरुस्त करून वीजपुरवठा कायम ठेवण्यासाठी लांडवंजारी यांनी लाचेची मागणी केली होती. तक्रारदाराकडे २ लाख ५९४ रुपयांचे देयक दाखवणारे मोठे बिल आले होते. हे बिल दुरुस्त करण्याच्या मोबदल्यात अभियंता लांडवंजारी यांनी बिलाच्या पाच टक्के रक्कमेची लाच मागितल्याचे ACBने सांगितले.
लाच देण्याची अनिच्छा व्यक्त करत तक्रारदाराने १९ नोव्हेंबर रोजी ACBकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची प्राथमिक पडताळणी पूर्ण झाल्यानंतर आज, २० नोव्हेंबर रोजी, ACBच्या पथकाने दीपनगर येथील महावितरण कार्यालयात सापळा रचला. लांडवंजारी यांनी तक्रारदाराकडून ५ हजारांची लाच स्वीकारताच पथकाने त्यांना तात्काळ ताब्यात घेतले व अटक केली.
या कारवाईत पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सहभाग घेतला. लांडवंजारी यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, १९८८ च्या कलम ७ अंतर्गत भुसावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ACBच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा सार्वजनिक सेवकांकडून होणाऱ्या भ्रष्टाचाराच्या घटनांवर चर्चा रंगू लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा