जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुक्यातील सत्यसाई नगर परिसरात मंगळवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री साडेदहाच्या सुमारास तीन अनोळखी इसमांनी मोटारसायकलस्वारावर हल्ला करून तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांची रोकड असलेली थैली बळजबरीने हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी मोहम्मद यासीन मोहम्मद इस्माईल (वय ३९, रा. सत्यसाई नगर, खडका रोड, भुसावळ) हे मंगळवारी रात्री आपल्या मोटारसायकलवरून (क्रमांक MH 19 BC 5586) घराकडे जात असताना ही घटना घडली. सत्यसाई नगर येथील कॉम्प्लेक्सजवळील रस्त्यावर तीन अनोळखी इसमांनी त्यांच्या मोटारसायकलला मुद्दाम धडक दिली. धडकेमुळे यासीन यांची निळ्या रंगाची चेन असलेली चौकोनी थैली खाली पडली. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी थैली बळजबरीने हिसकावून घेतली आणि पसार झाले.
थैलीत २५ लाख रुपये (५०० रुपयांच्या नोटांमध्ये) आणि ऑफिसचे अतिरिक्त ४२ हजार रुपये अशी एकूण २५ लाख ४२ हजार रुपयांची रोकड होती. घटनेची माहिती मिळताच भुसावळ तालुका पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ०२०७/२०२५ असा दाखल करण्यात आला असून, तो भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४) आणि ३(५) अंतर्गत नोंदविण्यात आला आहे. तपासाची सूत्रे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या हाती असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि इतर पुरावे गोळा करून आरोपींचा शोध घेत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, रात्रीच्या वेळी मोठ्या रकमेची वाहतूक करताना विशेष काळजी घ्यावी आणि संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ १०० क्रमांकावर संपर्क साधावा.
टिप्पणी पोस्ट करा