राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी रत्नागिरी येथे निवड
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महाराष्ट्र युवा क्रीडा संचालनालय आयोजित जिल्हा क्रीडा परिषद आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या वतीने विभागीय कॅरम स्पर्धेचे आयोजन नाशिक येथे करण्यात आले. ही स्पर्धा १६ ऑक्टोबर रोजी पार पडली. नाशिक, जळगाव, धुळे, नगर आणि पुणे या विभागांतील अनेक खेळाडूंनी या स्पर्धेत उत्साहाने सहभाग नोंदविला.
या स्पर्धेत जळगाव जिल्ह्याच्या १४ वर्षाखालील गटातून जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलचा विद्यार्थी विआन सुनील तलरेजा याने उल्लेखनीय कामगिरी करत आपले कौशल्य सादर केले.
क्वार्टर फायनलमध्ये विआन तलरेजाने अनुभूती इंग्लिश मिडियम स्कूलच्या साईल सोनवणे याचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला. त्यानंतर सेमी फायनलमध्ये नाशिकच्या सोहम तुषार पवार याला पराभूत करत तो अंतिम फेरीत दाखल झाला. अंतिम सामन्यात मालेगावच्या बारयाल अली गुलाम अली याच्यावर विजय मिळवत विआन तलरेजाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेतील उत्तुंग कामगिरीबद्दल विआन तलरेजाला शालेय क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रिती जाजू आणि श्री. भूषण सर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
विभागीय स्तरावरील विजयानंतर आता विआन तलरेजाची रत्नागिरी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला शिवछत्रपती पुरस्कार विजेते योगेश धोंगडे यांनी प्रशिक्षण दिले आहे.
विआनच्या या यशाबद्दल शाळेच्या क्रीडा शिक्षिका प्राजक्ता खलकर, आई राशी तलरेजा, वडील सुनील तलरेजा तसेच नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा