जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चाळीसगाव तालुक्यातील हातगाव येथून झालेल्या दुचाकी चोरीच्या तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांच्याकडून २९ पाणबुडी मोटारींची चोरी उघडकीस आली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
एलसीबी पथकाने सोमनाथ उर्फ लंगड्या रघुनाथ निकम (रा. अंघारी), सुधीर नाना निकम आणि सम्राट रविंद्र बागुल (दोघे रा. महारवाडी) या तिघांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. प्रारंभी त्यांनी चोरलेल्या ११ पाणबुडी मोटारी पोलीसांसमोर कबूल केल्या. पुढील तपासात चोरीचा आकडा २९ पर्यंत पोहोचला.
चाळीसगाव व नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शिवारातील शेतांमधून रात्रीच्या वेळी पाणबुडी मोटारी चोरून, त्या स्वतःच्या मालकीच्या असल्याचे भासवून विक्री करण्यात आल्याचे उघड झाले आहे.
या तपासात पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोनि शशिकांत पाटील, उपनिरीक्षक शेखर डोमाळे, तसेच त्यांच्या पथकातील अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. पोलिसांनी ज्या शेतकऱ्यांच्या पाणबुडी मोटारी चोरीस गेल्या आहेत, त्यांनी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा