जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I विना परवाना गावठी पिस्तुल आणि कोयता घेऊन नेहरु नगर परिसरात दहशत माजविणाऱ्या हद्दपार आरोपीसह तिघांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई २५ ऑक्टोबर रोजी रात्री करण्यात आली असून, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हद्दपार आरोपी तेजस दिलीप सोनवणे (२५, रा. कांचननगर) याच्यासह खुशाल पितांबर सोनार (२१) आणि चेतन पितांबर सोनार (२३, दोघे रा. पार्वताबाई ओक नगर) हे तिघेही नेहरु नगरातील संदीपनी बॉईज हॉस्टेलजवळ गावठी पिस्तुल व कोयता घेऊन फिरत होते. याबाबतची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाला मिळताच त्यांनी तत्काळ कारवाई करून तिघांना ताब्यात घेतले.
तिघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून गावठी कट्टा आणि कोयते हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी पोलीस कर्मचारी किरण पाटील यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, उपनिरीक्षक राहुल तायडे पुढील तपास करीत आहेत.
कारवाईत सहभागी पथक
एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोनि बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोउनि राहुल तायडे, सफौ विजसिंग पाटील, पोह गणेश शिरसाळे, पोह प्रमोद लाडवंजारी, पोह किरण चौधरी, पोकों गणेश ठाकरे, पोकों किरण पाटील, पोकों नितीन ठाकुर, पोकों राहुल घेटे आणि पोकों योगेश घुगे यांनी ही कारवाई केली.
टिप्पणी पोस्ट करा