सहा आरोपींना अटक, २३.४२ लाख रुपये व तीन मोबाईल हस्तगत
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I भुसावळ तालुका पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या तब्बल २५ लाख ४२ हजार रुपयांच्या लुटीच्या गुन्ह्याचा (गु.क्र. २०७/२०२५) अवघ्या दोन दिवसांत पर्दाफाश करण्यात भुसावळ पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या प्रकरणात सहा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून २३ लाख ४२ हजार रुपये रोख आणि तीन मोबाईल फोन हस्तगत केले आहेत. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार हा फिर्यादीच्या कंपनीतीलच ड्रायव्हर शाहीद बेग असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
घटनेची सविस्तर माहिती अशी की, दि. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री सुमारे १०:२० वाजता फिर्यादी मोहम्मद यासीन ईस्माईल हे आपल्या कार्यालयातील २५ लाख ४२ हजार रुपये एका बॅगेत घेऊन मोटारसायकल (एमएच-१९-बीसी-५५८६) वरून घरी जात होते. दरम्यान, मौजे खडके शिवारातील सत्यसाईनगरकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर तिघा अनोळखी इसमांनी त्यांच्या चालत्या मोटारसायकलला धक्का दिला. त्यामुळे त्यांचा तोल गेला आणि त्या संधीचा फायदा घेत आरोपींनी मोटारसायकलच्या पेट्रोल टाकीवर ठेवलेली पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावली आणि ते मोटारसायकलवर बसून पळून गेले.
या प्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३०९ (४), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तपासादरम्यान फिर्यादीचा ड्रायव्हर शाहीद बेग याच्यावर संशय आल्याने त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीत त्यानेच हा गुन्हा रचल्याचे आणि साथीदारांना ‘टिप’ दिल्याचे कबूल केले.
शाहीद बेग हा फिर्यादी ज्या ‘रॉयल कंपनी’मध्ये काम करतो त्या कंपनीत ड्रायव्हर आहे. त्याला पैशांच्या ने-आण वेळेची माहिती असल्याने त्यानेच आपल्या साथीदारांना पैसे मिळविण्याची माहिती दिली. त्याने अकाऊंटंट यासीन शेख यांच्याकडे पैसे असल्याची माहिती मुजाहीद मलीक व मोहम्मद दानिश या दोघांना दिली. या दोघांनी हा प्लॅन रावेर तालुक्यातील रसलपूर येथील अजहर फरीद मलक, अमीर खान युनुस खान आणि ईजहार बेग इरफान बेग यांना सांगितला. घटनेच्या रात्री या तिघांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन लुटीचा गुन्हा केला.
तपासात पुढे असेही समोर आले की आरोपींनी संगनमत करून कट रचून हा दरोडा टाकला आहे. त्यामुळे गुन्ह्यात भारतीय न्यायसंहिता कलम ३१० (२) (दरोडा) हे वाढीव कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सर्व ६ आरोपींना अटक केली असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –
१) शाहीद बेग इब्राहिम बेग (वय २५, रा. भुसावळ) – मुख्य सूत्रधार / ड्रायव्हर
२) मुजाहिद आसीफ मलीक (वय २०, रा. भुसावळ) – कट रचणारा
३) मोहम्मद दानिश मोहम्मद हाशीम (वय १९, रा. भुसावळ) – कट रचणारा
४) अजहर फरीद मलक (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर) – प्रत्यक्ष लुटीतील आरोपी
५) अमीर खान युनुस खान (वय २४, रा. रसलपूर, ता. रावेर) – प्रत्यक्ष लुटीतील आरोपी
६) ईजहार बेग इरफान बेग (वय २३, रा. रसलपूर, ता. रावेर) – प्रत्यक्ष लुटीतील आरोपी
तपासात असेही समोर आले आहे की आरोपींपैकी काही जण यापूर्वीपासून गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. आरोपी शाहीद बेग याच्यावर मलकापूर शहर, बोराखेडी व मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात केबल चोरीचे गुन्हे नोंद आहेत, तर आरोपी अमीर खान याच्यावर रावेर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे.
पोलिसांनी आरोपींकडून लुटीच्या रकमेपैकी २३ लाख ४२ हजार रुपये रोख जप्त केले असून उर्वरित २ लाख रुपयांची रक्कम हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे. गुन्ह्याचा सखोल तपास सुरू असून सर्व आरोपींना मा. न्यायालयाने दि. ३ नोव्हेंबर २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे.
या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्री. महेश गायकवाड (भुसावळ तालुका पो.स्टे.) करीत आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदीप गावीत (भुसावळ उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. राहुल गायकवाड (स्था.गु.शा. जळगाव), पोलीस निरीक्षक श्री. राहुल वाघ (भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.) आणि श्री. महेश गायकवाड (भुसावळ तालुका पो.स्टे.) यांच्या पथकांनी केली.
तपास पथकात स.पो.उप.निरीक्षक रवी नरवाडे, पो.हे.कॉ. गोपाल गव्हाळे, उमाकांत पाटील, प्रेमचंद सपकाळे, ना.पो. श्रीकृष्ण देशमुख, ना.पो. विकास सातदिवे, पो.कॉ. प्रशांत परदेशी, राहुल वानखेडे, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे (स्था.गु.शा. जळगाव), श्रीमती पुजा अंधारे, पो.हे.कॉ. संजय तायडे, वाल्मीक सोनवणे, सुधीर विसपुते, जितू ठाकरे (भुसावळ तालुका पो.स्टे.), पो.कॉ. योगेश माळी, भुषण चौधरी, अमर अढाळे, प्रशांत सोनार (भुसावळ बाजारपेठ पो.स्टे.) आणि पो.कॉ. प्रमोद पाटील (रावेर पो.स्टे.) यांचा समावेश होता.
भुसावळ पोलिसांच्या या चोख तपासामुळे अल्पावधीत मोठ्या रकमेच्या लुटीचा पर्दाफाश झाला असून स्थानिक नागरिकांकडून पोलीस दलाचे कौतुक होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा