जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शिवाजीनगर प्रभागात रस्ते, उड्डाणपूल, अंडरपास, स्कायवॉक व सार्वजनिक शौचालय यांसारखी अनेक मूलभूत विकासकामे अपूर्ण राहिल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. निधीअभावी तसेच प्रशासकीय दिरंगाईमुळे ही कामे रखडल्याचा आरोप होत असून, संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसरातील सिलकोट, रस्त्यांचे काँक्रिटीकरण, रंगकाम, तसेच पावसाच्या पाण्याचा निचरा यासंबंधीची महत्त्वाची कामे अजूनही प्रलंबित आहेत. उड्डाणपुलाखाली सुलभ शौचालय बांधण्याचे कामही सुरु झालेले नाही. याशिवाय नागरिकांची पायपीट कमी करण्यासाठी पुलाच्या दोन्ही बाजूंनी लोखंडी जिना बसवण्याची मागणी वारंवार करण्यात आली असतानाही, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे.
विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे काम व उड्डाणपुलाचे काही महत्त्वाचे घटक अपूर्ण असतानाच सार्वजनिक बांधकाम विभागाने घाईघाईने हा पूल महापालिकेच्या ताब्यात दिला. महापालिकेनेही तो का स्वीकारला, असा सवाल माजी नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी उपस्थित केला आहे.
दारकुंडे यांनी आयुक्तांना पत्र लिहून या प्रलंबित कामांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. "निर्णयाबाबत लेखी स्वरूपात सविस्तर माहिती न दिल्यास नागरिकांसह आयुक्तांच्या दालनात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल," असा इशाराही त्यांनी दिला आहे.
बळीराम पेठ येथील रेल्वे रुळाखालून जाणारा अंडरपास आणि तहसील कचेरी ते ख्रिश्चन दफनभूमीपर्यंतचा स्कायवॉक देखील निधीअभावी रखडले आहेत. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी मनपाकडून दोन कोटी रुपयांची मंजुरी मिळालेली असूनही, निधी टप्प्याटप्प्याने न मिळाल्याने चबुतऱ्याचे काम अर्धवट स्थितीत आहे.
शिवाजीनगरमधील या गंभीर समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधत, नागरिकांनी आता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने त्वरित पावले उचलून प्रलंबित कामे पूर्ण करावीत, हीच नागरिकांची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा