जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृहात रविवारी दुपारी काही तरुण मद्यपान करत मटन पार्टी करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या प्रकरणाची तक्रार मिळताच महापालिका व जिल्हापेठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. छापा टाकला असता दोन जण पोलिसांच्या हाती लागले, तर चौघांनी पळ काढला.
सविस्तर वृत्त असे की, सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओनंतर शहर अभियंता योगेश बोरोले व बांधकाम अभियंता आर. टी. पाटील हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्याचवेळी डायल ११२ वर तक्रार मिळाल्याने जिल्हापेठ पोलीसही बालगंधर्व नाट्यगृहात दाखल झाले. पाहणीदरम्यान पार्टी करणारे तरुण पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यापैकी दोन जण पोलिसांच्या ताब्यात आले असून, चौघे फरार झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून रिकाम्या दारूच्या बाटल्या व मटन शिजविण्याचे साहित्य जप्त केले.
या संदर्भात बांधकाम विभागाच्या वतीने जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिस गुन्हा नोंदविण्याचे काम करीत आहेत. दरम्यान, नाट्यगृहाच्या मागील बाजूस असलेला मोकाट गुरांच्या कोंडवाड्याकडे जाणारा दरवाजा उघडा असल्याने, त्याच मार्गाने हे तरुण आत शिरल्याचा पोलिसांना संशय आहे.
टिप्पणी पोस्ट करा