जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत यंदा पारंपरिक ढोल-ताशा, विविध सांस्कृतिक झांजपथके आणि भव्य सजावट याबरोबरच मल्लखांब खेळाचे प्रात्यक्षिक हे अनोखे आकर्षण ठरले. शहरातील हिंदवी अकॅडमीचा युवा कलाकार हर्ष सचिन सोनवणे याने मल्लखांबावरील नेत्रदीपक कौशल्यपूर्ण सादरीकरण करून मिरवणुकीला वेगळेच रूप दिले.
हर्षने सादर केलेल्या कसरती पाहून नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. गणेश भक्तांसमोर पारंपरिक खेळातून ताकद, संतुलन आणि कलात्मकता यांचा सुंदर संगम साकारला गेला. विशेष म्हणजे, या सादरीकरणामागे गुरुवर्य धनराज भोई यांचे मार्गदर्शन लाभले असल्याचेही हर्षने सांगितले.
गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रथमच मल्लखांब प्रात्यक्षिक सादर झाल्याने उपस्थितांमध्ये उत्सुकता आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. सांस्कृतिक परंपरेला चालना देणाऱ्या या प्रयोगाचे शहरवासीयांनी कौतुक केले असून अशा सादरीकरणांना पुढेही प्रोत्साहन मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा