जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांना सहकारी महिला डॉक्टरशी गैरवर्तन करून शरीरसुखाची मागणी केल्याप्रकरणी रविवारी (दि. २१ सप्टेंबर) शहर पोलिसांनी अटक केली. त्यांच्या विरोधात यापूर्वीही अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. अखेर आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी तत्काळ निलंबनाचे आदेश काढत मोठी कारवाई केली. या घडामोडीमुळे महापालिकेसह वैद्यकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
३८ वर्षीय महिला डॉक्टरने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शाहू महाराज रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. घोलप यांनी घाणेरडे इशारे करून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. तसेच जबरदस्तीने शरीरसुखाची मागणी करत विनयभंग केला. त्यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. घोलप यांना अटक केली.
यापूर्वीच महापालिकेने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत उत्तर मागितले होते. मात्र गंभीर आरोप आणि विशाखा समितीच्या प्राथमिक अहवालानंतर आयुक्त ढेरे यांनी थेट निलंबनाचा आदेश दिला.
डॉ. घोलप यांच्या वादग्रस्त कारभाराची यापूर्वीही चर्चा झाली होती. जन्म-मृत्यू नोंदणी विभागात मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत नियुक्त महिला कर्मचारीऐवजी तिचा पती काम करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्याने त्यांची चौकशी सुरू होती. या सर्व बाबींचा अहवाल समितीने आयुक्तांकडे सादर केला होता. त्यानंतर अखेर डॉ. घोलप यांना निलंबन व अटकेचा फटका बसला आहे.
टिप्पणी पोस्ट करा